पुणे, पुढारी वृत्तसेवा: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात आठ तालुक्यातील शेतीमधील पिकांना फटका बसला आहे. यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 560 हेक्टर क्षेत्रावरील फळबाग, भाजीपाला, गहू, बाजरी पिकांचा समावेश आहे. शासकीय कर्मचार्यांच्या संपामुळे पंचनामे झालेले नाहीत.
सात तालुक्यातील 43 गावांतील 1 हजार 221 शेतकर्यांच्या 478 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. या शेतकर्यांना अनुदान देण्यासाठी सुमारे 70 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली. आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक 252 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, भाजीपाला, भुईमूग, बाजरी, गहू, चारा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ जुन्नर 174 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असून, यात द्राक्षाचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातील 23.50 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असताना शासकीय कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे पंचनामे करण्यासही त्यांना नकार दिला होता. त्यामुळे नायब तहसीलदारांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. परंतु, त्यांनीही चालढकलपणा केला. त्यामुळे वेळेत पंचनामे झालेले नाहीत. सध्या अंतिम पंचनामे सुरू आहेत.