Latest

कोल्हापूर : 54 मार्गांवरील वाहतूक बंद

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील पूरस्थिती 'जैसे थे' आहे. नद्यांच्या पाणी पातळीत गुरुवारी पुन्हा वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली असून, 54 मार्गांवरील वाहतूक बंद आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू ठेवण्यात आली आहे. करूळ घाट वाहतुकीसाठी बंदच असल्याने कोकणात जाणारी वाहतूक भुईबावडा घाटासह राधानगरी-फोंडा घाटमार्गे सुरू आहे. करूळ घाटातून कोकणात विशेषत: गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी एस.टी. वाहतूक फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर केर्ली ते केर्ले या दरम्यान पुराचे पाणी गुरुवारीही कायम होते. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंदच राहिली. ही वाहतूक केर्ली-गायमुख-वाघबीळ अशी वळविण्यात आली होती. दरम्यान, पहाटे रजपूतवाडीजवळ वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक तासभर ठप्प झाली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या रेस्क्यू टीमच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन हे झाड हटवले. यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

कोल्हापूर शहरातून पुणे-बंगळूर महामार्गाकडे जाणार्‍या कसबा बावडा-शिये मार्गावर तस्ते ओढ्यानजीक बुधवारी दुपारी पाणी आले होते. त्यातून वाहतूक सुरू होती. गुरुवारी मात्र या पाण्याची पातळी दीड-दोन फुटांपर्यंत वाढल्याने दुपारनंतर त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर ये-जा करणार्‍या नागरिकांना तसेच शिरोली औद्योगिक वसाहतीतील कर्मचार्‍यांना तावडे हॉटेलमार्गे शहरात ये-जा करावी लागत होती.

शहरातही सखल भागातील पुराच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. गुरुवारी सकाळी कदमवाडी ते जाधववाडी यांना जोडणार्‍या रस्त्यावर पुराचे पाणी आले. दुपारी पाणीपातळी वाढल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. त्यामुळे मार्केट यार्ड ते कदमवाडी, कसबा बावडा अशी वाहतूक शहराच्या मुख्य रस्त्यावरून सुरू होती.

धामणी खोर्‍यात पुन्हा पाणी पातळी वाढली

पन्हाळा तालुक्यातील धामणी नदीच्या खोर्‍यात पुन्हा पाणी पातळीत वाढ झाली. बुधवारी रात्रीपर्यंत दीड ते दोन फुटांनी पाणी पातळी कमी झाली होती. यामुळे गुरुवारी परिसरातील काही बंधार्‍यांवरील पाणी कमी होईल अशी शक्यता होती. मात्र, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत झालेल्या पावसाने पुन्हा नद्यांच्या पाणी पातळीत एक-दीड फुटाने वाढ झाली. कळे परिसरात कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यालगत चार फुटांपर्यंत पाणी कमी होते. गुरुवारी त्यात पुन्हा एक-दीड फुटाची वाढ झाली आहे. यामुळे पावसाचा जोर वाढला तर कोल्हापूर-गगबावडा रस्ता पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती आहे. धामणी खोर्‍यातील गोठे पूल पाण्याखाली गेला आहे. सुळे, आंबर्डे, वेतवडे, शेणवडे आदी बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

75 बंधार्‍यांवर पाणी

जिल्ह्यातील 75 बंधार्‍यांवर पाणी आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7 राज्यमार्ग आणि 18 प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंद आहे. त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने ठिकठिकाणी वळवण्यात आली आहे. यासह जिल्ह्यातील 8 इतर जिल्हा मार्ग आणि 21 ग्रामीण रस्ते अशा एकूण 54 मार्गांवर पाणी असल्याने ते बंद असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT