नवी दिल्ली : रक्ताची, लोहाची कमतरता विशेषतः महिलांमध्ये अधिक दिसून येते. या स्थितीला 'अॅनिमिया' असे म्हटले जाते. युवा महिला वर्गात आयर्नची म्हणजेच लोह तत्त्वाची कमतरता वाढू लागली आहे. 21 वर्षांपर्यंतच्या 17 टक्के महिला किंवा तरुणींमध्ये लोहाची कमतरता दिसून आली. अमेरिकेत पन्नास वर्षांखालील 35 टक्के, तर भारतात 52 टक्के महिला अॅनिमियाने पीडित आहेत. आयर्नची कमतरता असलेल्या महिलांमध्ये थकवा जाणवतो, चिडचिडेपणा येऊ लागतोे; परंतु या गोष्टी जीवनाचा एक भाग असल्याचे मानून महिला त्याकडे दुर्लक्ष करतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात म्हटले आहे.
ही स्थिती आणखी काही काळ राहिल्यास त्याचे रूपांतर तणाव, वैफल्य तसेच हृदयासंबंधी विकारात होऊ शकते. तांबड्या रक्तपेशींचे प्रमाण राखण्यात आयर्नची महत्त्वाची भूमिका असते. आयर्न कमी असल्यानंतर शरीराची ऊर्जा या पेशींची क्रिया सुरळीत राहावी यावर अधिक खर्च होते. हृदय, मेंदू आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. एकूणच आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी ठरते. आयर्नची कमतरता दर्शवणारे काही लक्षणे आहेत. श्वास घेण्यात अडचण, विचारांत अस्पष्टता, थकवा, चक्कर येणे, थंड तापमानाबद्दलच्या संवेदनशीलतेत वाढ, हृदयाच्या ठोक्यात अनिश्चितता, इत्यादी त्याची लक्षणे असतात. आहारात सफरचंद, बीट, पालक, डाळिंब यांचा समावेश करणे गरजेचे असते. तसेच अंडी, मासे, डाळी, दूध व दुग्धजन्य पदार्थांचाही आहारात समावेश असावा, असे तज्ज्ञ सांगतात.