पुणे : पुढारी वृत्तसेवा : भाऊचा तांडा, ग्रामपंचायत शेळगाव (ता.सोनपेठ, जि. परभणी) येथील शेतामधील सेप्टिक टँकची सफाई करताना मृत पावलेल्या सफाई कामगारांना राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यतत्पर्तेमुळे 50 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य शासनाने मंजूर केले. भाऊचा तांडा, ग्रामपंचायत शेळगाव (ता.सोनपेठ, जि. परभणी) येथील शेतामधील सेप्टिक टँकची सफाई करताना दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना 11 मे रोजी घडली होती. मृत पावलेल्या एकूण 5 सफाई कामगारांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य करण्याकरिता सामाजिक न्याय विभागाने प्रत्येक व्यक्ती 10 लाख याप्रमाणे एकूण 50 लाख रुपयांचा निधी 12 मे रोजी शासन निर्णयानुसार मंजूर केला आहे.
जिल्हाधिकारी परभणी यांनी 12 मे रोजी समाज कल्याण विभागास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावर तत्काळ पाठपुरावा करून रक्कम मंजूर केली. परमेश्वर दगडू राठोड यांच्या शेत वस्तीवरील घराच्या सेफ्टी टँकमधील मैला सफाईचे काम करताना टाकी पडून सादिक रहीम शेख, जुनेद दाऊद शे , शाहरुख सादिक शेख, फिरोज गफार शेख व नवीद शेख यांचा मृत्यू झाला.