मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात नवीन वाहनांची भर पडतेय तशी रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्यादेखील वाढते आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यात ३ हजार ५४८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. म्हणजेच दिवसाला विविध अपघातांत सुमारे ४० जणांचा जीव जात आहे. वाढते अपघात आणि बळी रोखण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागासमोर आहे.
अपघातांमध्ये महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि विविध सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याला फारसे यश येताना दिसत नाही. राज्यात दिवसाला ४० हजाराहून अधिक नवीन वाहनांची भर पडत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. जानेवारी महिन्यात राज्यात २१५६ अपघात झाले असून त्यामध्ये १ हजार ५१ जणांचा बळी गेला. फेब्रुवारी महिन्यात २२५० अपघातांमध्ये १२२९ जणांचा, तर मार्च महिन्यात २३३३ अपघातांमध्ये १२६८ जणांचा मृत्यू झाला.
वाढत्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने जिल्हास्तरावर ॲक्शन प्लान तयार केला आहे. तसेच अपघात कशामुळे होतात याची कारणे शोधण्याबरोबरच ब्लॅकस्पॉटचाही शोध घेण्यात येत आहे.
वेग जास्त, बेदरकारपणे गाड्या चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळणे.
मागील वर्षीच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण सध्या १३ टक्क्यांनी घटले आहे. मात्र अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे.