मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील ३९ महिलांना टार्गेट करत गुजरातमधील १९ वर्षीय तरुणाने सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून त्यांच्याजवळून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. यातील २२ महिलांनी समोर येत पोलिसांत तक्रार दिली असून याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
गुजरातमधील रहिवासी असलेला १९ वर्षीय आरोपी आदित्य प्रशांत याने दहावीनंतर शिक्षण सोडले. तो गांधीनगरमधील सर्जिकल मास्क मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काम करु लागला. मात्र यासोबतच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधून त्यांच्याशी ओळख वाढवायचा. त्यानंतर महिलांच्या प्रोफाईलवर असलेले फोटो चोरी करुन ते मॉर्फ करत अश्लील व्हिडिओ क्लिप बनवून त्या सोशल मिडियावर प्रसारीत करण्याची धमकी देत महिलांकडून ५०० ते ४ हजार रुपयांची मागणी करत होता. अशाप्रकारे त्याने अॅन्टॉपहील भागातील सुमारे ३९ महिलांना टार्गेट करुन त्यांच्याकडून पैसे उकळले. आदित्य प्रशांत हा सोशल मीडिया वापरकर्त्यां महिलांसाठी दहशत बनला होता. यातील काहीजणींनी तर आत्महत्येचा टोकाचा विचारही केला होता. मात्र गेल्यावर्षी जुलै महिन्यात २२ महिलांनी समोर येऊन ॲन्टॉपहील पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. त्यानुसार गुन्हा दाखल करुन अॅन्टॉप हिल पोलिसांनी गांधीनगर पोलिसांच्या मदतीने आदित्य प्रशांत याला ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी आदित्यकडे कसून चौकशी करुन गुन्ह्याचा तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपी आदित्य प्रशांत हा सध्या जामिनावर बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.