नवी दिल्ली; वृत्तसंस्था : शहीद लान्सनायक चंद्रशेखर हरबोला यांचा मृतदेह 38 वर्षांनी मंगळवारी घरी पोहोचणार आहे. ते 19 कुमाऊं रेजिमेंटमध्ये असताना 29 मे 1984 रोजी सियाचीनवरून झालेल्या भारत-पाक युद्धात ऑपरेशन मेघदूतदरम्यान आलेल्या हिमवादळात शहीद झाले होते. तब्बल 38 वर्षांनंतर 13 ऑगस्ट रोजी चंद्रशेखर यांचा मृतदेह आढळला. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मंगळवारी त्यांचे पार्थिव हल्द्वानी (उत्तराखंड) येथे नेले जाईल.
बेपत्ता झाले तेव्हा चंद्रशेखर 28 वर्षांचे होते. आता त्यांच्या पत्नीचे वय 65 वर्षे झाले आहे. पण त्यांना आपले पती एक दिवस घरी येतील, असा विश्वास होता. हरबोला यांना दोन मुली आहेत. लष्करानेही आजतागायत जवानांच्या मृतदेहांसाठी शोधमोहीम सुरू ठेवलेली होती.
मोहिमेअंतर्गत सियाचीन ग्लेशिअरवरील बर्फ वितळण्यास सुरू झाल्यानंतर लष्कराने पुन्हा या भागात शोध घेतला असता चंद्रशेखर हरबोला यांचा मृतदेह ग्लेशिअरवरील एका जुन्या बंकरमध्ये आढळला. हरबोलांची ओळख लष्कराने दिलेल्या डिस्क क्रमांकावरून झाली.