पिंपरी: शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शहरातील खासगी शाळांमध्ये राखीव 25 टक्के जागांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांच्या प्रतीक्षा यादी क्रमांक 2 अनुसार अद्याप 329 विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश झालेले नाही. तर, 185 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आता यासाठी पुन्हा 28 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई अंतर्गत 174 शाळांमध्ये 3 हजार 255 विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव होत्या. यासाठी 4 एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली. 6 एप्रिलपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. 20 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत सर्व प्रवेश न झाल्याने 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढविण्यात आली.
त्यानंतरही बर्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने पुन्हा 10 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत 2023 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर, 1079 विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप बाकी आहे. त्यानंतर मात्र, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी देण्यात आली. प्रतीक्षा यादीतील टप्पा क्रमांक 2 मधील प्रवेश प्रक्रियेला 14 जूनपासून सुरुवात झाली. 21 जूनपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत 185 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर, अद्याप 329 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया प्रलंबित आहे. 16 विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध कारणांसाठी नाकारण्यात आले आहेत.
'आरटीई'अंतर्गत अद्याप प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक दोनमधील ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. त्यांनी महापालिकेच्या आकुर्डी आणि पिंपरी येथील केंद्रातून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. तसेच, शाळांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावे. त्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी 28 तारखेपर्यंत संधी मिळाली आहे.
– अनिता जोशी, पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षण विभाग, महापालिका