माणिक पवार
नसरापूर : 'प्रेमात सगळं माफ असतं' अशा वृत्तीने प्रेमवीरांचा सध्या पळून जाऊन लग्न करण्याचा सपाटा सुरू आहे. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 30 तरुणी पळून गेल्याचे नोंदविले गेले आहे. नोंद नसलेल्यांची संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. यामुळे पालकवर्ग चिंतेत आहे. एकूणच राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सध्या 'सैराट झालं जी' असे वातावरण आहे. यासाठी मुले आणि पालकांमध्ये वेळीच सुसंवाद होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
कोरोना काळात मुलांच्या हातात जादा प्रमाणात मोबाईल आल्याने सोशल मीडियाच्या छंदातून जिल्ह्यात प्रेमविवाह करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. नसरापूर (ता. भोर) येथील राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून विविध बहाणे सांगून बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. सन 2022 वर्षअखेर 18 वर्षांपुढील 30 तरुणी, 22 विवाहित महिला, 19 पुरुष घरातून निघून गेल्याच्या पोलिस ठाण्यात नोंदी आहेत. तर 9 जणांचे अपहरण झाले होते. यापैकी 80 टक्के मुलींनी प्रेमविवाह करून आपले संसार थाटले आहे. तर विवाहित असलेल्या 22 महिला घरगुती कारणावरून निघून गेल्या होत्या. वय 18 वर्षांपुढील 19 तरुणदेखील घरातून निघून गेल्याच्या नोंदी आहेत. तसेच 5 वयोवृद्ध हे बेपत्ता झाले होते.
राजगड पोलिसांनी बेपत्ता झालेल्या व्यक्तींना शोधण्यात यश मिळविले असून, जवळपास 95 टक्के बेपत्ता व्यक्ती मिळून आल्या आहेत. पळून गेलेल्या अनेक तरुणींनी व तरुणांनी 'तूच माझी आर्ची अन् मी तुझा परश्या' म्हणत स्वतःचा जोडीदार निवडल्याचे चित्र आहे. मात्र, काही मुली-मुलांनी लग्न केल्यानंतर एकमेकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यात कलह निर्माण होत आहे. तर काहीजण खोटे पती-पत्नी म्हणून राहत असल्याचे उजेडात आले आहे. घरातून रुसून निघून गेलेल्या काही तरुणी व विवाहित महिला या आपल्या मैत्रिणीकडे अथवा कामाला असलेल्या ठिकाणी मिळून आल्याचे चित्र आहे.
पालक व मुलांमधील संवाद हरवत चालला आहे. घरातील वातावरण आनंदाचे असायला हवे, पालक आणि मुलांमध्ये मैत्रिपूर्ण नातेसंबंध असायला हवेत. मुलींच्या अडचणी व समस्या दूर करण्यासाठी पालकांनी संपर्क करावा, त्यांना मदत करू'
प्रमिला निकम, पोलिस हवालदार, निर्भया पथक, राजगड