रायपूर; वृत्तसंस्था : प्रभू रामचंद्रांचे आजोळ (कौसल्या मातेचे माहेर) असलेल्या छत्तीसगडमध्येही अयोध्येतील मंदिराबद्दल उदंड उत्साह आहे. छत्तीसगडहून तीन हजार टन सुगंधित तांदूळ अयोध्येला रवाना होणार आहे. श्रीरामाच्या महाभंडाऱ्यात या तांदळाचा वापर होणार आहे. या तांदळाने महाभंडाऱ्यातून दरवळणाऱ्या सुगंधामुळे अवघी अयोध्या धन्य व्हावी, अशी रामाच्या मामाच्या या प्रदेशाची अपेक्षा आहे. तांदूळही तसाच निवडला जातो आहे.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्री विष्णूदेव साय हे २८ डिसेंबर रोजी तांदळांनी भरलेल्या ट्रकना हिरवा झेंडा दाखवतील. हे ट्रक ३० डिसेंबर रोजी अयोध्येत दाखल होतील. राज्यातील राईस मिलर्स असोसिएशनतर्फे सर्व ३३ जिल्ह्यांतून मागविलेला हा तांदूळ एकत्रित केला जात आहे. छत्तीसगडमधील प्रत्येक जिल्ह्यातील अत्युच्च दर्जाचा तांदूळ त्यासाठी निवडला गेला आहे. खरे म्हणजे अयोध्या राम मंदिर तीर्थ ट्रस्टचे चंपत राय यांचीही छत्तीसगडमधील तांदळाबद्दल ओढ होतीच. छत्तीसगडला तांदळाची वाटी म्हटले जाते, हे त्यामागचे कारण ! या राज्यात एकाहून एक सरस प्रतीचा तांदूळ पिकतो.
छत्तीसगडमधील लोक रामाची पूजा तर करतातच; पण रामाला छत्तीसगडचा भाचाही मानतात. रायपूरलगत चंदखुरीतील पांढऱ्या कमळाच्या तलावात माता कौसल्येचे मंदिरही या राज्यातील लोकांनी दहाव्या शतकापासून उभारलेले आहे. रायपूरलाच त्रेता युगात कौशलपूर म्हणून ओळखले जात असे, अशी वदंता आहे.
श्रीरामचंद्राचे सासर असलेल्या नेपाळमधील जनकपुरातून वस्त्रे, फळे आणि सुक्या मेव्यासह ११०० थाळ्यांचा उपहारही अयोध्येला येणार आहे. रामाला अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादात आजोळचे तांदूळ आणि सासरचा मेवा असा दुहेरी ठेवा असेल! राम मंदिर तीर्थ ट्रस्टनेही या माहितीला दुजोरा दिला.
हेही वाचा :