IPL History : मुंबई इंडियन्सचा बुमराह आयपीएलमध्ये ‘या’ 3 फलंदाजांसमोर होतो फेल! 
Latest

IPL History : मुंबई इंडियन्सचा बुमराह आयपीएलमध्ये ‘या’ 3 फलंदाजांसमोर होतो फेल!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ (IPL 2022)चे काउंटडाऊन सुरु झाले आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असणारी ही क्रिकेट लीग सुरू व्हायला फक्त काही दिवस बाकी आहेत. आयपीएलमध्ये जसे फलंदाज स्फोटक फलंदाजी करून धावांचा डोंगर उभा करतात, तसेच जसप्रीत बुमराहसारखे काही गोलंदाज आहेत जे आपल्या चतुराईने धावा रोखण्याचा प्रयत्न करतात आणि विकेट घेण्यातही यशस्वी ठरतात.

आयपीएलमधील घातक गोलंदाजांमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहची गणना होते. बुमराहला आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा प्राण समजतात. बुमराहनेही अनेक वेळा शानदार गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला आहे. या गोलंदाजासमोर धावा काढणे हे सर्वात कठीण काम मानले जाते. बुमराहसमोर फलंदाज नेहमीच आपली विकेट वाचवताना दिसतो, पण आयपीएलच्या इतिहासात असे तीन फलंदाज आहेत ज्यांच्यासमोर बुमराहची जादू काहीशी फिकी पडली आहे. आपण अशा ३ फलंदाजांबद्दल चर्चा करूया जे बुमराहची पिटाई करून धावा वसूल करतात. (IPL 2022)

विराट कोहली

जसप्रीत बुमराहने जगातील दिग्गज फलंदाजांना त्याच्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. आयपीएलमध्ये बुमराहने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला आपला पहिला बळी बनवले. मात्र आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली हा जसप्रीत बुमराहविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. विराटने १४ डावांमध्ये बुमराहचा सामना केला आहे. या १४ डावांमध्ये विराटने बुमराहविरुद्ध १५० च्या स्ट्राईक रेटने आणि ३१.५० च्या सरासरीने १२६ धावा केल्या आहेत. विराटने बुमराहच्या चेंडूंवर १४ चौकार आणि ५ षटकारही ठोकले आहेत. आयपीएलमध्ये विराट केवळ ४ वेळा बुमराहच्या चेंडूवर बाद झाला आहे. (IPL 2022)

एबी डिव्हिलियर्स

क्रिकेट विश्वात मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये १८४ सामन्यांमध्ये ३९.७० च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या. यामध्ये तीन शतके आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. बुमराहविरुद्ध जबरदस्त धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी डिव्हिलियर्सचा समावेश होतो. बुमराह आणि डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये १३ वेळा आमनेसामने आले आहेत. या १३ डावांमध्ये डिव्हिलियर्सने १४७.०५ च्या स्ट्राइक रेटने आणि ४१.६६ च्या सरासरीने १२५ धावा केल्या आहेत. बुमराहविरुद्ध डिव्हिलियर्स फक्त ३ वेळा बाद झाला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि ८ षटकारही मारले आहेत. पण यावेळी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. गेल्या वर्षी त्यांने निवृत्ती जाहीर केल्याने यंदाच्या आयपीएलमध्ये चाहत्यांना त्याच्या स्फोटक खेळीला मुकावे लागणार आहे. (IPL 2022)

केएल राहुल

जसप्रीत बुमराहविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या केएल राहुलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. केएल राहुल सध्या टी-20 मधील भारतातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. राहुल नेहमीच बुमराहविरुद्ध धावा करतो. बुमराह आणि केएल राहुल आयपीएलमध्ये १० वेळा आमनेसामने आले आहेत. या १० डावांमध्ये त्याने १३२.१४ च्या स्ट्राईक रेटने आणि ५५.५० च्या सरासरीने १११ धावा केल्या आहेत. त्याला बाद करण्यात बुमराहला फक्त दोनवेळाच यश आले आहे. राहुलने बुमराहविरुद्ध १० चौकार आणि ४ षटकारही मारले आहेत. या मोसमात केएल राहुल लखनौ सुपर जायंट्स या नव्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. या संघाचे तो नेतृत्वही करणार आहे. त्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. (IPL 2022)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT