पुणे; पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या पुणे विभागाने काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या २६ कर्मचाऱ्यांची बुधवारी (दि.१०) रात्री उशिरा निलंबन केले आहे. यात बारामती येथील विभागतील वर्कशॉप, इंदापूर, नारायणगाव, राजगुरुनगर डेपोतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शासनाने हे आंदोलन दडपण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसापासून आतापर्यंत 542 कर्मचारी राज्यभरात निलंबित करण्यात आले आहेत. बुधवारपासून राज्यातील एसटी स्थानकामधून खासगी बस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आता एसटीच्या पुणे विभागातील ४ डेपोमधील २६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पुणे विभागात काम बंद आंदोलनाला या चार डेपो मधून सुरुवात झाली होती. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करायला सुद्धा याच ४ डेपोपासून सुरुवात केली असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे राज्यभर प्रवास काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येत आहे. पुणे विभागात सुद्धा २६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे २६ कर्मचारी इंदापूर, नारायणगाव, राजगुरुनगर, बारामती येथील डेपोमधील आहेत.
– रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग