Latest

कोल्हापूर : अडीचशे वर्षांपूर्वीच्या हस्तलिखितांचे जतन

Arun Patil

कोल्हापूर, गौरव डोंगरे : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीच्या धर्मशास्त्र विभागाने संदर्भ ग्रंथालय उभारले आहे. 250 वर्षांपूर्वीचे प्राकृत ओवीबद्ध श्रीगुरुचरित्र हस्तलिखित ग्रंथ याठिकाणी जपून ठेवण्यात आले आहेत. चार वेद, अठरा पुराणे, आरण्यक, संहिता ग्रंथ, शब्दकोश, मंदिर निर्माणशास्त्र, ज्योतिषीय गणित सिद्धांत आदी आवश्यक ग्रंथ याठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. धर्मग्रंथांची निर्मिती करणार्‍या बनारस विश्वविद्यालय, संपूर्णानंद विश्वविद्यालय येथील ग्रंथांचा यामध्ये समावेश असून, वाराणसीच्या चौखंबा प्रेसचीही प्रकाशने येथे उपलब्ध करण्यात आली आहेत.

यज्ञीय हवन, शक्ती आगम, शैव आगम, भैरव आगम, नित्यषोडशीकार्नाव, महाषोडशी, श्रीविद्यार्णाव, देवी भागवत यासह चारही वेद, आरण्यक, संहिताग्रंथ, शब्दकोश, वेदान्त, उपनिषद संग्रह, आयुर्वेद, दर्शनशास्त्र, शक्ती आगम, श्री विद्यातंत्र, मूर्तीशास्त्र, योगशास्त्र, धर्मशास्त्र यासह 692 पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध करण्यात आली आहेत.

देवस्थान समिती कार्यालयाशेजारीच हे ग्रंथालय उभारण्यात आले आहे. गणेश नेर्लेकर यांच्याकडे ग्रंथालयाचे व्यवस्थापन असून, ही जागाही अपुरी पडेल इतकी पुस्तके येथे आणण्यात आली आहेत. देवीच्या पूजेसह देवस्थान समितीकडील कोणत्याही मंदिराकडे होणारे होमहवन, कर्मकांडे यासाठी येथे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ग्रंथालयाची व्याप्ती वाढविण्याचा मानस

ग्रंथालयाला राघवेंद्रस्वामी मठाचे मठाधीश सुबुद्धेन्द्रतीर्थ स्वामी, विभागीय आयुक्त सौरभ राव, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणेचे कुलपती पी. डी. पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूरचे कुलपती संजय डी. पाटील, राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य देवानंद शिंदे आदींनी भेट दिली आहे. भविष्यात या ग्रंथालयाची व्याप्ती वाढविण्याचा मानस देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी बोलून दाखविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT