इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: इंदापूर पोलीसांनी सरडेवाडी टोल नाका येथे कारवाई करत साठ लाख रुपयांचा तब्बल २४० किलो गांजा पकडला आहे. या प्रकरणी रूपेश दिलीप जाधव( रा. वृंदावन पार्क, कसबा, बारामती) आणि सुनिल तुळशीदास वेदपाठक (रा. वाघज रोड, देवळे पार्क बारामती ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तेलंगणा राज्यातील विशाखापट्टणम येथून पुणे कडे जाणाऱ्या हुंदाई कंपनीच्या क्रेटा मोटारीमध्ये गांजा घेऊन जाताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय खबरीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
इंदापुर पोलीस स्टेशनमध्ये गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०(ब), २०(२) (क), २९ भादवि क ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेटा मोटारीमध्ये गांजा घेऊन जात असल्याची खबर इंदापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने गुरुवारी (दि.९) रात्री ८ वाजताच्या दरम्यान सरडेवाडी टोलनाका येथे सापळा लावला. यावेळी सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने एक हुंदाई कंपनीची क्रेटा मोटार (एम .एच. 42 ए. 5656) ही पोलीसांना संशयास्पद वाटली.
पोलीसांनी त्या मोटारीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता मोटारीतील लोकांनी मोटारीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते अपयशी ठरले. पोलीसांनी मोटारीची डिक्की उघडुन पाहीली असता डिक्की आणि मधल्या सिटच्या खाली खाकी रंगाचे चिकटपट्टीचे आवरण असलेले १२० पॅकेट्स मिळून आले. यामध्ये पोलीसांना कॅनाबीज वनस्पतीची पाने, फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकीरी रंगाचा असा ६० लाख रुपये किमतीचा एकुण २४० किलो ओलसर गांजा मिळून आला. त्याबरोबरच १० लाख रुपये किमतीची कार ताब्यात घेण्यात आली.
पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उप विभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली इंदापुर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहाय्यक निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस नाईक सलमान खान, हवालदार बालगुडे, जवान लक्ष्मण सुर्यवंशी, दिनेश चोरमले, शिधाराम गुरव, विनोद काळे, गजानन वानोळे व विकास राखुंडे, विक्रम जमादार यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रकाश पवार हे करीत आहेत.