Latest

3 राज्यांतील विजयाने भाजपसाठी 2024 लोकसभा मैदान अनुकूल

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : छत्तीसगड आणि राजस्थान ही गत निवडणुकीत काँग्रेसकडे गेलेली राज्ये पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यात; मध्य प्रदेशमध्येही गत निवडणुकांपेक्षा अधिक जागा मिळवण्यात तसेच तेलंगणात आपले अस्तित्व अधोरेखित करण्यात भाजपने आता मिळविलेले यश हे 2024 च्या लोकसभेसाठी मैदान अनुकूल करणारे ठरले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील राज्यनिहाय सत्तास्थितीचा आढावा घेतला तर 52 टक्के लोकसंख्येवर भाजप काबीज आहे. निर्विवाद सत्तेच्या द़ृष्टीने काँग्रेस आता तीन राज्यांपुरती मर्यादित झाली आहे. युतीसह (इंडिया) आता काँग्रेस पाच राज्यांतून सत्तास्थानी आहे.

देशातील 28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांपैकी 16 राज्यांत आता भाजप तसेच भाजप प्लस सरकार असेल. विशेष म्हणजे यातील 12 राज्यांत भाजपला कुणाच्याही कुबड्यांची गरज नसेल.

मोदींचा करिष्मा…

मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनण्यापूर्वी भाजप प्लस कोणत्या स्थितीत होती आणि आज काय स्थितीत आहे, त्याचा हा थोडक्यात आढावा…

सध्या देशात 30 विधानसभा आहेत. दिल्ली आणि पुद्दुचेरी हे दोन केंद्रशासित प्रदेशही आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निकालांअंती आता 16 राज्यांची सत्ता भाजपच्या हाती असेल.

दक्षिण भारतात कुठेही नसलेल्या भाजपने कर्नाटकातील ठळक अस्तित्वापाठोपाठ तेलंगणातही जम बसविला आहे. उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये स्वबळावर असलेला भाजप महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीममध्ये युतीच्या माध्यमातून सत्तेत आहे. काँग्रेसच्या हातून दोन राज्ये निसटली आहेत. कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशव्यतिरिक्त आता बिहार, झारखंडमध्ये काँग्रेस युतीच्या माध्यमातून सत्तास्थानी असेल.

देशाच्या सहा भागांचे वर्गीकरण केले, तर दक्षिण आणि पूर्व भारत सोडून बाकी चारही म्हणजे उत्तर, पश्चिम, ईशान्य, मध्य भारतात भाजप एक शक्ती म्हणून ठामपणे उभा आहे.

ईशान्येतील आठ राज्यांत 498 आमदारांपैकी भाजपचे 206 आमदार आहेत. या राज्यांतून 25 खासदार येतात. यापैकी 15 भाजपचे आहेत.

पश्चिम भारताचा विचार केला तर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये भाजपचा दबदबा आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपचे सरकार आहे. गुजरातपाठोपाठ राजस्थानमध्ये आता भाजप पूर्ण बहुमतात असेल. राजस्थान विजयानंतर या भागातील भाजपच्या आमदारांची संख्या निम्म्यावर जाईल. तूर्त या भागातील 99 खासदारांपैकी 73 खासदार भाजपचे आहेत.

पूर्व भारतातील बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा राज्यांत भाजपचा तितकासा प्रभाव नाही आणि झारखंड वगळता काँग्रेसचाही नाही. याउपर या भागातील एकूण 722 आमदारांपैकी 196 आमदार भाजपचे आहेत. विशेष म्हणजे 117 खासदारांपैकी 54 भाजपचे आहेत.
उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब वगळता हरियाणा, हिमाचल, यूपी, उत्तराखंडमध्ये भाजपचा दबदबा आहे. दिल्ली, पंजाबात आम आदमी पक्ष आहे. उत्तर भारतातील 818 आमदारांपैकी भाजपकडे 377 आहेत. 189 खासदारांपैकी 98 भाजपचे आहेत.

मध्य भारतातील मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने मोठा विजय मिळविलेला आहे. येथील 420 आमदारांपैकी 144 भाजपचे होते, त्यात एमपी, छत्तीसगडच्या निकालानंतर स्वाभाविकपणे वाढ झालेली आहे. या भागातील 40 पैकी 37 खासदार भाजपचे आहेत, हे महत्त्वाचे.

दक्षिण भारतातील कर्नाटक गमावल्यानंतर कुठल्याही राज्यात भाजप सत्तेत नाही. कर्नाटक गमावल्यानंतर दक्षिण भारतातील भाजपच्या एकूण आमदारांच्या संख्येत घट झाली असून, ही संख्या 130 वरून95 वर आली आहे; पण तेलंगणातील निकालाने थोडी का असेना, भाजपच्या आमदार संख्येत पुन्हा वाढ झालेली आहे. या भागात भाजपचे आज 29 खासदार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT