नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अमेरिकेच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून भारताचा सत्ताधारी 'भारतीय जनता पक्ष जगातील सर्वांत महत्त्वाचा विदेशी राजकीय पक्ष आहे. २०१४ आणि २०१९ मधील विजयानंतर भाजप २०२४ मध्ये पुन्हा विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे मत वॉल्टर रसेल मीड यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमधील लेखात व्यक्त केले.
मुस्लिम ब्रदरहूडप्रमाणे, भाजपने पाश्चात्त्य उदारमतवादाच्या अनेक कल्पना आणि प्राधान्यक्रम नाकारले. तथापि, ते आधुनिकतेची प्रमुख वैशिष्ट्ये स्वीकारतात. इस्रायलमधील लिकुड पक्षाप्रमाणे भाजपकडे लोकवादी वक्तृत्व आणि पारंपरिक मूल्यांसह मूलगामी बाजार समर्थक आर्थिक भूमिका आहेत. तथापि, ते अशा लोकांच्या संतापालाही वाट करून देतात ज्यांचा महानगरीय पाश्चात्त्य – केंद्रित सांस्कृतिक आणि राजकीय उच्चभूंनी बहिष्कार आणि तिरस्कार केला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमधील लेखात म्हटले आहे की, अमेरिकन विश्लेषक विशेषत: डाव्या-उदारमतवादी विचारसरणीचे, अनेकदा नरेंद्र मोदींच्या भारताकडे पाहतात आणि डेन्मार्कसारखे का नाही, हे विचारतात. त्याची चिंता पूर्णपणे चुकीची नाही. सत्ताधारी आघाडीवर टीका करणाऱ्या पत्रकारांना छळवणुकीला सामोरे जावे लागू शकते.
मीड म्हणाले की, अनेक लोकांना आरएसएस या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शक्तीची भीती वाटते, ज्याचा भाजप नेतृत्वाशी जवळचा संबंध आहे. तथापि, भारताच्या ईशान्येकडील ख्रिश्चनबहुल राज्यांमध्ये भाजपला अलीकडील काही वर्षांत उल्लेखनीय राजकीय यश मिळाले आहे.
उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला शिया मुस्लिमांचा भक्कम पाठिंबा आहे. जातीय भेदभावाविरुद्ध लढण्याच्या प्रयत्नांमध्ये आरएसएस कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मीड यांनी लिहिले, भाजप आणि आरएसएसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तसेच त्यांच्या काही समीक्षकांसोबतच्या सखोल बैठकीनंतर मला खात्री आहे की, अमेरिकन आणि पाश्चिमात्य लोकांना एका शक्तिशाली चळवळीमध्ये अधिक सखोलपणे सहभागी होण्याची आवश्यकता आहे.
आगामी काळात भाजप भारतात वेगाने आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, भारताच्या मदतीशिवाय चीनची वाढती ताकद रोखण्याचे अमेरिकेचे प्रयत्न अयशस्वी होतील. लेखक मीड यांना असे वाटते की, भाजपला कमी लेखले जाते, कारण ते बहुतांश अभारतीयांना अपरिचित आहेत. भाजपच्या निवडणूक रणनीतीमध्ये हिंदू अजेंडा स्पष्टपणे दिसत आहे. पाश्चात्त्य उदारमतवादाच्या अनेक कल्पना आणि प्राधान्यक्रम भाजपने नाकारल्याचे लेखात म्हटले आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे भाजपला एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशाचे नेतृत्व करून जागतिक महासत्ता बनण्याची आशा आहे, असे या लेखात म्हटले आहे.