Latest

केरळ साखळी बॉम्बस्फोटाच्या चौकशीसाठी 20 जणांचे पथक

दिनेश चोरगे

एर्नाकुलम; वृत्तसंस्था :  केरळमधील एर्नाकुलम येथील झामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या चौकशीसाठी 20 जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. अपघातातील मृतांची संख्या आता 3 झाली आहे. एक 12 वर्षांची मुलगी रात्री उशिरा रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावली. स्फोटातील नेमक्या जखमींचा आकडा 41 असल्याचे सोमवारी सांगण्यात आले. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती अद्याप अत्यवस्थ आहे.

17 जण विविध रुग्णालयांत दाखल आहेत. यापैकी 12 जण अतिदक्षता विभागात असून, 3 जण व्हेंटिलेटरवर आहेत. प्रकृती अत्यवस्थ असलेले चारही जण 50 ते 60 टक्के भाजलेले आहेत, असे राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्फोटबाबत सोमवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. बैठकीनंतर, एडीजीपी कायदा आणि सुव्यवस्था यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष पथक या घटनेची चौकशी करेल, असे विजयन यांनी सांगितले. तपास पथकात 20 सदस्य असतील, असेही ते म्हणाले.

स्फोटांच्या घटनेनंतर कोडकरा पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण करून आपणच स्फोट घडविल्याची कबुली देणार्‍या डॉमिनिक मार्टिन या व्यक्तीविरुद्ध यूएपीए अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे राज्याचे एडीजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) अजित कुमार यांनी सांगितले.

मार्टिननेच बॉम्ब ठेवल्याचे स्पष्ट

प्रार्थनेदरम्यान सभागृहात मार्टिननेच बॉम्ब ठेवला होता, असे केरळ पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांकडे फेसबुकवरील व्हिडीओसह मार्टिनच्या फोनमधून आयईडीचा स्फोट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रिमोट कंट्रोलचे व्हिज्युअलही उपलब्ध आहेत.

स्फोटापूर्वी डॉमिनिकने केले फेसबुक लाईव्ह

डॉमिनिक मार्टिनने आत्मसमर्पण करण्यापूर्वीच एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता. मीही ख्रिश्चनांमधील जेहोवा साक्षीदार पंथीय कुटुंबातील एक सदस्य आहे. या पंथाची विचारसरणी मला आवडत नाही. देशाबद्दल तरुणांच्या मनात विष कालवण्याचे काम सुरू असल्यानेच मी त्यांच्या या प्रार्थना सभेत बॉम्बस्फोट केला, असे डॉमिनिक मार्टिन या फेसबुक लाईव्हमधून सांगत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT