Latest

गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत पोलिसांनीच मागितले २० लाख ; दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन गस्तीवरील पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे २० लाख रुपयांची मागणी केली. तसेच, तडजोडीअंती चार लाख ९८ हजार रुपये घेतले. याप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन शेजाळ अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यासह अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा, शंकर गोरडे, मुन्नास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे आणि मोहम्मद अहमेर मिर्झा या चौघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (१९, रा. किवळे, पुणे. मूळ रा. झारखंड) या तरुणाने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौहान हा तरुण किवळे येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दरम्यान, देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार आणि अन्य आरोपींनी मिळून फिर्यादी विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार, १० फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आरोपींनी किवळे येथील एका कॅफे मधून अपहरण केले. त्यानंतर मायाज लॉन्ज, गहुंजे स्टेडीयम आणि तिथून फिर्यादी यांना देहूरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ठाण्यात नेल्यानंतर गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये घालण्याची धमकी देण्यात आली. यातून सुटका करायची असल्यास २० लाख रुपये दयावे लागतील,अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार, फिर्यादी यांनी घाबरून गुगल पे आणि नेट बँकिंगद्वारे आरोपींना चार लाख ९८ हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT