Latest

Elephant Attack Jharkhand: धोनीच्या रांचीत हत्तीमुळे कलम 144 लागू, 12 दिवसांत 16 जणांना चिरडले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Elephant Attack Jharkhand : झारखंडच्या ग्रामीण भागात आजकाल जंगली हत्तीने दहशत निर्माण केली आहे. गेल्या 12 दिवसांत राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये या हत्तीच्या हल्ल्यात 16 जणांना जीव गमवावा लागला आहे. सोमवार-मंगळवारच्या रात्री तर रांची जिल्ह्यातील इटकी ब्लॉकमध्ये हत्तीने पाच जणांना चिरडले. त्यात चार जणांचा मृत्यू झाला. जखमी व्यक्ती गंभीर असून त्याच्यावर आरआयएमएस येथे उपचार सुरू आहे.

रांचीचे विभागीय वन अधिकारी श्रीकांत वर्मा यांनी सांगितले की, 'घटनेनंतर इटकी ब्लॉकमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. ग्रामस्थांना विशेषत: सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी घरात राहण्यास सांगितले आहे. इटकी ब्लॉकमध्ये जंगली हत्तींच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. गावात हत्ती आला की, लोक त्याला हाकलण्यासाठी किंवा कुतूहलाने पाहण्यासाठी त्याच्या जवळ जातात. त्यामुळे जीवितहानी होत आहे. जंगली हत्तींचा सामना करण्यासाठी पश्चिम बंगालमधील तज्ज्ञांच्या पथकासह वनविभाग अवश्यक ती पावले उचलत आहे.' (Elephant Attack Jharkhand)

वनसंरक्षक (वन्यजीव) शशिकर सामंत म्हणाले, 'रांची वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली 4 विभागांमध्ये वन अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. एकाच हत्तीने सर्व 16 जणांचा जीव घेतला आहे का? याचा शोध समितीला घ्यायचा आहे. आम्हाला असे वाटते की हत्ती अचानक हिंस्र झाला आहे. हत्तीने जाणूनबुजून लोकांना मारले की, निष्काळजीपणामुळे लोकांचा बळी गेला याचीही चौकशी केली जाईल,' अशी माहिती दिली. (Elephant Attack Jharkhand)

लोहरदगा येथे रविवारी आणि सोमवारी हत्तीने 2 महिलांसह 4 जणांना चिरडून ठार केले. तर रांचीपासून 25 किमी अंतरावर असलेल्या इटकी ब्लॉकच्या गावात हत्तीने 2 महिलांसह 4 जणांना चिरडले. मंगळवारी सकाळीही 1 जण जखमी झाला. या हत्तीने 2 आठवड्यांपूर्वी हजारीबागमध्ये 5 जणांचा बळी घेतला असावा, अशी भीती डीएफओने व्यक्त केली आहे. रामगड जिल्ह्यातील गोला ब्लॉकमध्येही एका व्यक्तीचा चिरडून मृत्यू झाला. यानंतर चतरा येथे 1 जण ठार झाला. (Elephant Attack Jharkhand)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT