पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. जितक्या जास्त उमेदवार अर्ज मागे घेतील तितका जास्त फायदा भाजप आणि महाविकास आघाडीला होणार आहे. आज अर्ज माघार घेण्याची मुदत संपेपर्यंत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांनी माघार घेतली असून या मतदारसंघात सोळा उमेदवार रिंगणात राहिले आहेत. काँग्रेसचे बंडखोर बाळासाहेब दाभेकर तसेच आप आणि संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्य लढत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात होईल.
संभाजी ब्रिगेडने पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीतुन माघार घेतली आहे. पुण्यातील कसबा आण चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आमदार सचिन अहिर यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहे.