नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशभर 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये उघडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेसाठी 1 हजार 570 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुढील दोन वर्षांच्या कालावधीत ही नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जातील. दरम्यान, सरकारने वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीला चालना देण्यासाठीच्या धोरणाला मंजुरी दिली आहे. वैद्यकीय उपकरणांच्या आयातीवरील भिस्त कमी व्हावी आणि देशांतर्गत उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी, असा प्रयत्न या धोरणाद्वारे केला जाणार आहे.
केंद्र सरकारने गेल्यावर्षी वैद्यकीय उपकरण धोरण योजनेचा मसुदा जारी करून नंतर संबंधित क्षेत्रातील मान्यवरांची मते मागविली होती. वैद्यकीय उपकरणनिर्मिती धोरणामुळे पुढील पाच वर्षांच्या कालावधीत या उद्योगाची उलाढाल 11 अब्ज डॉलरवरून 50 अब्ज डॉलरवर जाईल, असा केंद्र सरकारचा विश्वास आहे.
वैद्यकीय उपकरण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी सरकारने याआधीच उत्पादन आधारित सवलत योजना (पीएलआय) सुरू केली आहे. त्यांतर्गत मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी वैद्यकीय उपकरणनिर्मिती पार्क तयार करण्यात आले आहेत. शिवाय, वैद्यकीय उपकरणनिर्मितीच्या 26 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पात 1,206 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती मांडवीया यांनी दिली.