Latest

मोबाईलमुळे सुखी संसारात कलह! सोशल मीडिया कालवतोय संसारात विष

अमृता चौगुले

श्रीकांत राऊत

नगर: सोशल मीडिया अर्थात व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियामुळे नवरा-बायकोमधील संवाद दुरावत चालला असून, अनेकांचे वैवाहिक आयुष्य मोबाईलमुळे उद्ध्वस्त होत आहे. गत सहा महिन्यांत भरोसा सेलकडे पती-पत्नीमध्ये वाद झाल्याच्या तब्बल 1305 तक्रारी आल्या असून, यामध्ये 80 टक्के तक्रारी मोबाईलमुळे वाद झाल्याच्या आहेत.

अहमदनगर पोलिसांच्या भरोसा सेलच्या आकडेवारीवरून 80 टक्के सुखी संसारात विष कालविण्याचे काम मोबाईल करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवरा-बायकोच्या नात्यामधील गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊन ठेपली आहे. नवरा-बायकोमधील बहुतांश वादाला मोबाइल हेच कारण बनले आहे. अनेक तक्रारींमध्ये सतत फोनवर बोलणे, सोशल मीडियावर जास्त वेळ घालविणे, या सर्व कारणांमुळे वाद होत आहेत. यापूर्वी हुंडा, घरगुती हिंसाचार, दारूडा पती, अनैतिक संबंध ही कारणं घटस्फोटासाठी दिली जात होती.

हायटेक युगात आणि बहुतांश जोडपी उच्चशिक्षित असतानासुद्धा सोशल मीडियासारखं कारण घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवरा-बायकोमध्ये होणार वाद जणू 'कहानी घर घर की' सारखेच झाले, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

995 प्रकरणांमध्ये समुपदेशन

भरोसा सेलकडे गत सहा महिन्यांत पती-पत्नींच्या तक्रारींचा ओघच सुरू आहे. चालू वर्षांत आतापर्यंत 1305 तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये 995 तक्रारी भरोसा सेलच्या समुपदेशन केंद्राने समुपदेशनाद्वारे सोडविल्या आहेत. तसेच, 330 प्रकरणात चौकशी सुरू आहे.

154 प्रकरणांत गुन्हे दाखल

भरोसा सेलकडे पती-पत्नीमधील वादाची तक्रार आल्यानंतर समुपदेशाद्वारे तक्रार निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही प्रकरणात समुपदेशन करून सुद्धा मार्ग निघत नसल्याने, शेवटी गुन्हा दाखल होता. अशाच पती-पत्नीमधील 154 प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

असा होतो गुन्हा दाखल..

एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक वा छळ केल्यास भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 498 अ नुसार गुन्हा दाखल होतो. तर 3 वर्षांचा कारावास व दंड अशा शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. हा गुन्हा दखलपात्र व अजामिनपात्र असल्याने पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाते.

पती-पत्नीमधील वाद असलेल्या तक्रारींमध्ये मोबाईलचे कारण 80 टक्के आहे. मोबाईलवरून झालेल्या वादाच्या शेकडो तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींवर संबंधितांना एकत्रितपणे बोलावून घेत, समुपदेशन करीत पुन्हा संसार जुळविण्यासाठी भरोसा सेलकडून प्रयत्न सुरू आहेत.
– पल्लवी उबरहंडे, सहायक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल, अहमदनगर

असे आहे तक्रारींचे स्वरूप

  1. सतत मोबाईलवर टाईम पास करणे
  2. सोशल मीडियावर चॅटिंग करणे.
  3. अनैतिक संबंध असल्याचा दोघांमध्ये संशय.
  4. सासर व माहेरच्यांचा संसारात हस्तक्षेप.
  5. लहानसहान कारणावरून मारहाण होणे.
  6. जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत मोबाईलवर बोलणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT