Latest

धक्कादायक! चेन्नईतील बाईक रेसिंगदरम्यान 13 वर्षीय रायडरचा मृत्यू

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळूर येथील 13 वर्षीय प्रतिभावान मोटरसायकल रायडर कोप्पाराम श्रेयस हरीश (shreyas hareesh) याचा शनिवारी (दि. 5) चेन्नईतील मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे अपघाती मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर स्पर्धेचे आयोजक मद्रास मोटर स्पोर्ट्स क्लबने शनिवार आणि रविवारची रेसिंग स्पर्धा रद्द केली.

शनिवारी सकाळी श्रेयस (shreyas hareesh) पोल पोझिशनवर पात्र ठरला होता. टर्न-1 मधून बाहेर पडत असताना दुचाकीवरून ट्रॅकवर श्रेयस जोराने आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताचे झाल्याचे समोर येताच स्पर्धा ताबडतोब थांबवण्यात आली आणि ट्रॉमा केअर रुग्णवाहिकेतून श्रेयसला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण, रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी श्रेयसला (shreyas hareesh) मृत घोषित केले. यावेळी त्याचे वडील कोप्पाराम हरीश उपस्थित होते.

26 जुलै 2010 रोजी जन्मलेला श्रेयस हा 9 व्या वर्षापासून बाईक रेसिंग धडे गिरवत होता. बंगळूर येथील केन्सरी स्कूलमध्ये त्याचे शिक्षण सुरू होते. एक उगवता स्टार म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली होती. पेट्रोनास TVS वन-मेक चॅम्पियनशिपच्या रुकी प्रकारात भाग घेऊन त्याने या मोसमात राष्ट्रीय स्तरावर सलग चार शर्यती जिंकल्या. मात्र, चेन्नईतील रेसिंग स्पर्धेदरम्यान त्याला आपला जीव गमवावा लागला. शर्यत सुरू झाल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली.

श्रेयसने या वर्षी मे महिन्यात मिनीजीपी इंडियाचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याने स्पेनमधील मिनीजीपी शर्यतीत चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. तो ऑगस्टमध्ये मलेशियातील चॅम्पियनशिपमध्ये उतरणार होता. भारतीय मोटरस्पोर्टमधील या वर्षातील हा दुसरा मृत्यू आहे. जानेवारीमध्ये, मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2022 च्या दुसऱ्या फेरीत अपघातादरम्यान 59 वर्षीय केई कुमार या प्रतिष्ठित रेसरचे निधन झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT