पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेन-रशिया युद्धाचा आज 12वा दिवस आहे. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे. युद्धात अनेकांना जीव गमवावा लागला आहे, लाखो नागरिक जखमी झाले आहेत. युक्रेनमधील बहुतेक लोक भीतीमुळे इतर देशांमध्ये आश्रय मिळवण्याच्या उद्देशाने स्थलांतर करत आहेत. गेल्या काही दिवसांत दहा लाखांहून अधिक लोक निर्वासित झाले आहेत.
दरम्यान, एका 11 वर्षीय युक्रेनियन मुलाने (Ukraine Boy) जीव वाचवण्यासाठी 1000 किमीचा प्रवास एकट्याने केला आणि त्याने स्लोव्हाकिया देशात प्रवेश केला. आणि तो स्लोव्हाकियाला पोहोचला. यावेळी त्याच्याकडे बॅकपॅक, आईची चिठ्ठी आणि दूरध्वनी क्रमांक आढळून आला.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती किती भयावह आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र तेथे राहणारे लोक भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा अंदाजही लावता येत नाही. अशा परिस्थितीत अनेक लोक युक्रेनमधील संकटग्रस्त भाग सोडून इतर देशांमध्ये जात आहेत.
हा मुलगा दक्षिण-पूर्व युक्रेनमधील झापोरिझ्झ्याचा रहिवासी आहे. गेल्या आठवड्यात रशियन सैन्याने या भागात जोरदार हल्ला करत त्याच्यावर कब्जा केला होता. एका वृत्तानुसार, ११ वर्षीय मुलाच्या आजारी नातेवाईकाची काळजी घेण्यासाठी त्याच्या आई-वडीलांना युक्रेनमध्ये राहावे लागले. 1000 किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण केल्यानंतरही त्या मुलाच्या चेह-यावर एक हसू होते. त्याच्या हसतमुख, निर्भयपणा आणि दृढनिश्चयासाठी त्याची सर्वच स्तवरावरून प्रशंसा होत आहे. स्लोव्हाकियाच्या अंतर्गत मंत्रालयाने फेसबुक पोस्टमध्ये मुलाला 'काल रात्रीचा सर्वात मोठा नायक' म्हटले आहे.
रिपोर्टनुसार, मुलाच्या आईने त्याला त्याच्या नातेवाईकांना शोधण्यासाठी स्लोव्हाकियाला रेल्वेने पाठवले. यावेळी मुलाकडे एक पिशवी, पासपोर्ट आणि घडी घातलेली एक चिठ्ठी (ज्याच्यावर नातेवाईकांचा फोन नंबर होता) देण्यात आली.
खडतर प्रवासाअंती हा मुलगा स्लोव्हाकियाच्या सीमेवर पोहोचला, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यानी त्याला तपासले आणि विचारपूस केली. त्यानंतर त्या मुलाने आपल्या जवळील पासपोर्टमध्ये फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी स्लोव्हाकियाच्या पोलिस अधिका-यांना दाखवली. त्याने आपली सर्व माहिती अधिका-यांना दिली. त्यानंतर अधिका-यांनी राजधानी ब्रातिस्लाव्हा येथील त्या मुलाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि मुलाला त्यांच्या स्वाधीन केले.