हिप्परगी’च्या हलगर्जीपणामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती; कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचा आरोप

हिप्परगी’च्या हलगर्जीपणामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती; कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचा आरोप
Published on
Updated on

विटा; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे काढण्यात हलगर्जीपणा झाल्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात आज पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केला आहे.

याबाबत कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने थेट कर्नाटकच्या अलमट्टी कृष्णा भाग्यजल निगम लि.च्या अधीक्षक अभियंतांना सविस्तर पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की, आय एमडीने दिलेल्या सतर्कतेचा इशाऱ्यानंतर सध्या कोकणपट्टी आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना कृष्णा तसेच पंचगंगा आणि वारणा नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यांतही पंच गंगा, वारणा या नद्या पात्र भरून वाहत आहेत. नदी काठावरील भाग पाण्याखाली गेला आहे. लोक भयभीत झाले आहेत. हाता तोंडाशी आलेली पिके पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला सर्वस्वी कर्नाटकच्या अखत्यारीत असलेल्या हिप्परगी बंधाऱ्याचे व्यवस्थापन करणारे अधिकारीच जबाबदार आहेत. कारण या हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत काढण्यात हलगर्जीपणा झाल्यामुळे राजाराम बंधारा, तेरवाड इचलकरंजी, नरसोबावाडी भाग तसेच पंचगंगा, वारणा नदी पाणी पातळीने धोका पातळी गाठली आहे.

अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीकडे सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे

सध्याची अलमट्टी धरणाच्या पाण्याची पातळी आज (दि. २२) सकाळी ८ वाजताच्या दरम्यान ५१२.५६ मीटर इतकी होती. याच दरम्यान त्यामध्ये येणाऱ्या पाण्याचा येवा म्हणजे आवक ८३ हजार ९२५ क्यूसेक्स इतकाच होता. केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार या अलमट्टी धरणातील पाणी पातळी ३१ जुलैच्या महिनाअखेर पर्यंत ५१३.६० मीटर ठेवावी. परंतु या केंद्रीय जल आयोगाच्या नियमांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे, वास्तविक हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडणे गरजेचे असताना काल शुक्रवारी दुपारी २१ जुलै रोजी हे दरवाजे उघडले. हे दरवाजे या आधीच उघडले असते तर महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली नसती. पुढच्या आठवड्यात सलग सहा दिवस मोठा पाऊस येणार आहे असा हवामान अंदाज व्यक्त केला गेला आहे. हे लक्षात घेऊन सांगली, कोल्हापूर या भागातील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे योग्य नियोजन करून अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे.

शिवाय हिप्परगी बंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिले पाहिजे असे मत कृष्णा महापूर नागरी कृती समिती च्या माध्यमातून अजित वझे (रा. हिप्पर्गी) प्रदीप वायचळ, प्रमोद माने, जल अभ्यासक यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, कृष्णा महापूर कृती समितीने अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्याकडे प्रत्यक्ष भेट देऊन ही वस्तुस्थिती संबंधितांच्या लक्षात आणून दिली आहे. वेळ प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे विशेष बैठकीची मागणी करू असे मत ही समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, विजय कुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, संजय कोरे, सतीश रांजणे यांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news