

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकी बाळा
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १॥
जय देव जय देव श्री शंकरा आरती ओवाळू तुज कर्पूगौरा ॥ धृ ॥
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव ॥ २ ॥
देवी दैत्यी सागरमंथन पै केले
त्यामाजी अवचित हलाहल जे उठिले
ते त्वां असुरपणे प्राशन केले
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय देव ॥ ३॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुळटिळक राम दासा अंतरी ॥ जय देव ॥ ४ ॥