Kolhapur Crime : डॉक्टर युवतीशी विनयभंगप्रकरणी एका प्रसिद्ध मालिकेतील कलाकारास कोल्हापुरात अटक
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : लग्नाचा प्रस्ताव ठेवून युवतीशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या दूरचित्रवाणीवरील एका प्रसिद्ध मालिकेतील कलाकारास राजारामपुरी पोलिसांनी शनिवारी अटक केली. जितेंद्र शैलाजी पोळ (वय ३२ रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा जेल परिसर कळंबा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. (Kolhapur Crime)
संशयिताला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की शादी डॉट कॉम वेबसाईटवरून संशयिताची युवतीशी परिचय झाला. ती युवती डॉक्टर असल्याचे समोर आले आहे.
ओळखीनंतर त्याने लगट वाढविण्याचा प्रयत्न केला. तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पीडित तरुणी ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी जाऊन तिच्याशी मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. असे सांगून सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
Kolhapur Crime : संशयिताकडून लज्जा उत्पन्न होईल अशा कृत्याचा प्रयत्न
युवतीने लग्नाच्या प्रस्तावाला वारंवार नकार दिला तरीही संशयिताने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळलेल्या युवतीने नातेवाईकाकडे तक्रार करून थेट पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.
शनिवारी मध्यरात्री संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले. पोलिसांचा त्यास तातडीने अटक केली आहे. चौकशीमध्ये संबंधित तरुण दूरचित्रवाणीवरील एका प्रसिद्ध मालिकेत काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे असेही ओमासे यांनी सांगितले.

