

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आईची आठवण आल्याने निवासी शाळेतून परस्पर घराकडे जाणार्या 12 वर्षीय शाळकरी मुलाला अमानुष मारहाण करून जखमी करणार्या वाशी (ता. करवीर) येथील नवोदय अॅकॅडमीतील शिक्षकाविरुद्ध मंगळवारी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिवाजी पांडुरंग भावके (वय 30, रा. कुराडेवाडी, पोस्ट वाघवे, ता. पन्हाळा) असे शिक्षकाचे नाव आहे.
या घटनेची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दखल घेऊन दोषी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश करवीर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक पोलिस उपाधीक्षकांना दिले. त्यानंतर संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुलाची आई श्रीमती संगीता सरदार जाधव (30, रा. कोपार्डे, ता. करवीर) यांनी दोषीविरुद्ध फिर्याद दाखल केली.
दीड वर्षापूर्वी पतीच्या निधनानंतर जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. श्रीमती जाधव कंपनीत काम करून घराचा उदरनिर्वाह करीत आहेत. मुलाच्या शिक्षणाचा भार पेलवत नसल्याने त्यांनी एकुलत्या 12 वर्षीय मुलाला वाशी येथील नवोदय अॅॅकॅडमी या निवासी शाळेत पाचवीच्या वर्गात घातले होते.
चार-पाच दिवसांनंतर आईची आठवण आल्यानंतर मुलगा रडू लागला. मुलाने शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधून घराकडे पाठवण्याची विनंती केली होती. मात्र, टाळाटाळ करण्यात आली. सोमवारी सकाळी साडेसात वाजता मुलगा कोणाला काहीही न सांगता शाळेतून बाहेर पडला. हा प्रकार शिक्षकांना समजताच मुलाला शाळेत आणण्यात आले. परस्पर शाळेतून बाहेर का गेलास, हा राग मनात ठेवून त्यास मारहाण करण्यात आली.
मुलाच्या डोळ्याचा भाग काळा-निळा पडला आहे. शिवाय, चेहर्यावरही मारहाणीचे व—ण दिसून येत होते. हा प्रकार आई श्रीमती जाधव यांना समजताच त्यांनी निवासी शाळेकडे धाव घेतली. जखमी मुलावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांचा अहवाल प्राप्त होताच मारहाण करणार्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.