

कसबा वाळवे : पुढारी वृत्तसेवा : कालव्यावर बसवण्यात आलेल्या सहा विद्युत पंपांची चोरी झाल्याने शेतकऱ्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे. दि. ६ फेब्रुवारी रोजी एका पंपाची चोरी झाली असताना व त्याची राधानगरी पोलिसात रितसर तक्रार दाखल केलेली असतानाही त्या मोटार चोरणाऱ्यांचा अद्याप छडा लागलेला नाही. यादरम्यान शनिवार (दि. ९ मार्च) रोजी पुन्हा त्याच परिसरातील सहा विद्युत मोटर पंप चोरीस गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरट्यांचा राधानगरी पोलिसांना छडा लागणार का? असा शेतकरी सवाल करत आहेत.
कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या दूधगंगा उजव्या कालव्यावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंप बसविलेले आहेत. नदीपासून लांब असलेल्या या परिसरामध्ये बहुतांश शेतकरी या कालव्यातून पंपाच्या साहाय्याने पिकांना पाणी देतात. यामध्ये पांडुरंग शंकर शिंदे या शेतकऱ्याचा विद्युत पंप ६ फेब्रुवारी २०२४ रोजी चोरीस गेला होता. याबाबत शिंदे यांनी रितसर राधानगरी पोलिसात तक्रार दाखल केली होती, मात्र अद्याप चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
दरम्यान काल शनिवारी (दि. ९ मार्च) त्याच ठिकाणी शिंदे यांनी नव्याने बसवलेला पंप चोरट्यांनी चोरला तर याच परिसरातील श्रीमती भागीरथी दिनकर भोगटे (५ एचपी), भिकाजी बळीराम कोकाटे (३ एचपी), विलास विष्णू कोकाटे (५ एचपी), रघुनाथ गुंडू पाटील (५ एचपी), कै .बाबासो जोती कोकाटे (५ एचपी) या पाच शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांची एकाच रात्री चोरी झाल्याचे संबंधित शेतकऱ्याच्या रविवारी सकाळी निदर्शनास आले व त्यांनी राधानगरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
महिन्याभरापूर्वी दोन-तीन शेतकऱ्यांचे पंप लंपास झाले होते. शेतपिकांना हमीभाव नाही, तसेच अस्मानी-सुलतानीसारख्या अनेक संकटांचा सामना करत पिकांना जीवापाड जपणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या चोरीचा छडा राधानगरी पोलीसांनी तात्काळ लावून चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि यापुढे होणाऱ्या चोऱ्या थांबवाव्यात व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
अवैध धंदे राजरोस सुरू
अनेक छोट्या- मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेल्या या विभागात अनेक अवैध धंदे बोकाळले आहेत. मटका राजरोस सुरू आहे. गांजासारख्या नशील्या पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री होत असून अनेक तरुण या विळख्यात सापडल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. याला वेळीच पायबंद घालण्यासाठी पोलिसांची दबंग कामगिरी व्हायला हवी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांची आहे.