

पणजी; प्रभाकर धुरी : गुजराती सिनेमाला आपल्या देशातील इतर प्रदेश आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इफ्फी सारख्या अधिक व्यासपीठांची गरज आहे. भाषा, प्रान्त यांचे अडथळे तोडणे आणि खूप साऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे ही गुजराती सिनेमासाठी काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गुजराती अभिनेते सिद्धार्थ रांदेरिया यांनी गुरुवारी 23 रोजी गोव्यात 54 व्या इफ्फी मध्ये 'हरी ओम हरी' या चित्रपटाच्या गाला प्रीमियरच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत केले.
गुजराती चित्रपटांचे सौंदर्य आणि त्यातील मोहक कथाकथनाचे सार याबद्दल जागरूकता निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे', असे ते म्हणाले. अभिनेता रौनक कामदार यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात हिल्लारो सारख्या अनेक समीक्षकांनी प्रशंसित गुजराती चित्रपटांना इफ्फीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. भविष्यात अनेक चित्रपट IFFI मध्ये सामील होतील.
हरी ओम हरी या चित्रपटाच्या कथानकाविषयी बोलताना दिग्दर्शक निसर्ग वैद्य म्हणाले की, चित्रपटातील बारकावे गुजराती समाजाच्या भावनांशी जोडलेले आहेत आणि त्यांची संस्कृती प्रतिबिंबित करतात. प्रेक्षकांशी जोडले जाणे आणि कथेसह शक्य तितके वास्तविक असणे ही कल्पना आहे. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची संस्कृती असते म्हणूनच ती अद्वितीय आहे. चित्रपटातील विनोदी आणि मजेदार भाग प्रेक्षकांना नक्कीच पडद्यावर खिळवून ठेवेल.