

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईत यावर्षी पहिल्या सात महिन्यांत 3 हजार 354 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 83 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांचा आकडा जरी तीनपटीने वाढला असला, तरी आर्थिक गैरव्यवहाराच्या एकूण रकमेत मात्र घट झाली आहे. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करत आहे.
राज्यातील आजी-माजी मंत्री, नेतेमंडळी, त्यांचे नातेवाईक, मोठे व्यावसायिक यांच्याकडून करण्यात आलेले आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या पैशांच्या काळाबाजारप्रकरणी सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) धडक कारवाई सुरू आहे. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखाही 3 हजार 354 कोटी 12 लाख 31 हजार 326 रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांचा तपास करत आहे.