

सिंधुदुर्ग पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमंडली आहे. तालुक्यातील नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहत आहेत. फक्त आंदोलन झाले की तात्पुरते डॉक्टर दयायचे आणि पुन्हा चार- आठ दिवसांनी डॉक्टर्सना माघारी बोलावयचे.
परिणामी मूळ परिस्थिती कायम रहाणार असेल तर त्याचा काय उपयोग? असा संतप्त सवाल उपसभापती अरविंद रावराणे यांनी केला. सर्वच सदस्यांनी आरोग्य यंत्रणेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती अक्षता डाफळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहायक गटविकास अधिकारी शशिकांत भरसट, सर्व सदस्य व खातेप्रमुख उपस्थित
होते.
वैभववाडी शहरात सुसज्ज ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, गेले काही महीने रुग्णालयात पूर्णवेळ डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांची हेंडसाळ होत आहे. याबाबत हर्षदा हरीयाण, मंगेश लोके आदींनी प्रश्न केला.
ग्रामीण रुग्णायाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असल्याने सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. करार पद्धतीवर कार्यरत असलेले डॉ. धर्म यांना पुन्हा रुजू करावे, अशी मागणी केली. उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत 17 ते 18 गावे येतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या धर्तीवर त्या ठिकाणी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारावी, अशी मागणी सर्वांनी केली.
शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च विविध विकास कामे होत असतात. मात्र, बर्याच ठिकाणी सदर कामावर ठेकेदाराकडून कामाची तांत्रिक माहिती देणारे बोर्ड लावले जात नाहीत. यामुळे हे काम कोणत्या फंडातून होते. कामावर किती खर्च झाला आहे हे कळत नाही. पारदर्शक कारभारासाठी प्रत्येक कामाच्या ठिकाणी विकास कामांचे बोर्ड लावावा, अशी मागणी मंगेश लोके यांनी केली.
यावर जि. प. बांधकामचे उपअभियंता श्री. सुतार यांनी अशा कामांचे बोर्ड नसेल त्या ठिकाणी पैसे कट केले जातात असे सांगितले. मात्र, यावर आक्षेप घेत सदस्यांनी अशा ठिकाणी बोर्ड लावणे गरजेचे असल्याचे सांगितले.
वैभववाडी प्रा. आ. केंद्र व जि. प. विश्रामगृह समोरील अनधिकृत स्टॉल हटविण्यासाठी काय कार्यवाही केली? असा प्रश्न अरविंद रावराणे यांनी केला. पंचायत समिती नवीन इमारतीचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार? सदर काम आमच्या कारकीर्दीत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती,
आता किमान नवीन येणार्या पदाधिकार्यांना तरी सदर इमारतीत काम करायले मिळेल, अशी खंत वजा अपेक्षा सभापती अक्षता डाफळे व उपसभापती अरविंद रावराणे यांनी व्यक्त केली. शिराळे अंगणवाडी इमारत निर्लेखीत करुन त्याठिकाणी नवीन इमारत बांधावी,अशी सूचना हर्षदा हरयाण यांनी केली. यावेळी सर्व पं. स. सदस्यांचा सत्कार करण्यात आला.