

शिराळा; विनायक गायकवाड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागात वसलेल्या कोंडाईवाडी – गिरजवडे या भागात डोंगर, दर्या, वनस्पती, फुले बहरली आहेत. बहरलेले हे 'रानमाधुर्य' पर्यटकांना खुणावू लागले आहे.
वनअभ्यासक माधुरी लाड यांना या बहरलेल्या फुलांमध्ये वेगळेपण जाणवले. याची माहिती त्यांनी प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे प्रणव महाजन, नेहा हसबनीस यांना दिली. या सर्वांनाच या भागात दुर्मीळ ऑर्किड, दगडीपाला, गुलबक्षी, चित्रक, बोगनवेल, एपिजीना, तगर, पापयी, देंद्रोडियम, हर्र्बानारिया, रानहळद, भरांगी आदी दुर्मीळ वनस्पती, फुले, धोतरा, चाफा, रुई, अबोली, कंगुण्या, सदाफुली, सोनेरी, मोगरा आदींच्या वैविध्यपूर्ण वनस्पती आढळून आल्या. काही ठिकाणी दुर्मीळ फुलपाखरे, कीटक विविध आकारातील बेडूक दिसून आले.
याबाबत प्रणव महाजन म्हणाले, कोंडाईवाडी, धामवडे, गिरजवडे या परिसरातील डोंगर, दर्या, पठारे यावर आढळणारी फुले, पक्षी, कीटक आणि वनस्पती यातील काही प्रजाती दुर्मीळ आहेत. त्यांचा अभ्यास, निरीक्षण यासाठी हा सारा परिसर अभ्यासक, निरीक्षक यांना योग्य आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा कालावधी याकरिता अत्यंत योग्य आहे. तालुक्यातील उत्तर विभागात ही जैवविविधता आढळते हे कोणालाही माहीत नव्हते. दरम्यान, ही सारी माहिती माधुरी लाड यांच्यामुळे जगासमोर आली आहे.