

सांगली : उद्धव पाटीलनन : महानगरपालिकेकडील मानधनी, बदली, रोजंदारी कर्मचार्यांची परवड संपता संपेना झाली आहे. आयुष्यातील ऐन उमेदीची वीस-तीस वर्षे सरली, तरी अद्याप नोकरीत कायम होता आले नाही. त्यांना मिळणारा पगार तर अवघा 18 ते 20 हजार रुपये इतका आहे. वाढत्या महागाईत या अल्प पगारात त्यांचे जीणे मुश्कील झाले आहे. मात्र, त्याबद्दल यंत्रणेला ना खेद, ना खंत अशी अवस्था आहे.
महानगरपालिकेत कायम, मानधनी, बदली व रोजंदारी कर्मचारी काम पाहात आहेत. कायम कर्मचार्यांना चांगला पगार, वेतन आयोगाचे लाभ व इतर सोईसुविधा आहेत. मात्र, मानधनी, बदली, रोजंदारी कर्मचार्यांना किमान वेतनावरच समाधान मानावे लागत आहे. महानगरपालिकेत कायम कर्मचार्यांइतकीच मानधनी, बदली, रोजंदारी कर्मचारी आहेत. महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजाचा डोलारा बर्यापैकी या मानधनी, बदली, रोजंदारी कर्मचार्यांच्या खांद्यावर आहे. वेतन व अन्य सोई-सुविधांबाबत मात्र त्यांची उपेक्षा कायम आहे.
महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेची सारी जबाबदारी सफाई कामगारांवर आहे. त्यांची संख्या 348 इतकी आहे. सफाई कामगारांचा समावेश बदली कामगारांमध्ये आहे. अनेक वर्षे शासन व प्रशासनाशी भांडल्याचा परिणाम म्हणून त्यांना अलीकडे महिन्यातील 26 दिवस काम मिळत आहे. त्यांना या कामाचा मोबदला किमान वेतनानुसार मिळतो. मानधनी कर्मचार्यांची संख्या 1 हजार 7 इतकी आहे. अभियंता, औषधनिर्मातापासून ते मजूर, व्हॉल्व्हमन, डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, सफाई कामगार, वाहन चालक, बागमाळी, पंप ऑपरेटर, वायरमन, फायरमन आदी पदांवर हे मानधनी कर्मचारी काम करत आहेत. त्यांचा पगार एकोणीस ते वीस हजार रुपयांपर्यंत आहे. काही मजूर, वायरमन, लिपिक, काही सफाई कामगारही रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करत आहेत. बदली, मानधनी, रोजंदारी कर्मचार्यांना दरमहा 18 हजार 500 ते 20 हजार रुपये पगार मिळत आहे. वाढत्या महागाईत हा पगार अगदीच तुटपुंजा आहे. या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाहही मुश्कील आहे. तिथे चांगले राहणीमान त्यांच्या स्वप्नातही येत नसावे (काही उपद्व्यापी मानधनी कर्मचार्यांचा अपवाद वगळता).
अनेक मानधनी, रोजंदारी व बदली कर्मचारी गेली 30-35 वर्षे काम करत आहेत. आज ना उद्या सेवेत कायम होईल, या आशेने ते नोकरीत रुजू झाले. मात्र, अद्यापही ते सेवेत कायम होऊ शकले नाहीत. सेवानियम नसणे, आकृतिबंध मंजूर नसणे आदी काही कारणांमुळे ते लटकले. सेवानियमात विचार होईल. आजपर्यंतच्या कमी पगारातील नोकरीचा विचार होईल, अशी आशा मानधनी, बदली, रोजंदारी कर्मचार्यांमध्ये होती. मात्र, ती पूर्णत्वास जाताना दिसत नाही. त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. त्याची दखल महानगरपालिका व शासनाला घ्यावी लागेल.
लेखी परीक्षा, मुलाखतीद्वारे सन 2006 मध्ये महानगरपालिकेत मानधनी अभियंता म्हणून नोकरी मिळाली. आज ना उद्या सेवेत कायम होईल, या आशेवर 17 वर्षे गेली. सुरुवातीला 3 हजार पगार होता, आता 19 हजार रुपये पगार आहे. मानधनी नोकरीत रुजू होताना डिप्लोमा शैक्षणिक अर्हता होती. आता सेवानियमात अभियंता पदासाठी बीई, एमई शैक्षणिक अर्हता निश्चित केली आहे. त्यामुळे नोकरीवरच टांगती तलवार आहे. नवीन सेवानियमात कार्यरत मानधनी कर्मचार्यांचा विचार होणे गरजेचे आहे. – एक मानधनी अभियंता, महानगरपालिका