अर्धे डोके कशामुळे दुखते? ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा

अर्धे डोके कशामुळे दुखते? ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा
Published on
Updated on

अर्धशिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे. कुठल्याही भागात ठणका किंवा संपूर्ण डोकेही दुखू शकते. अर्धशिशीमध्ये डोके खूप जोरात ठणकते. परंतु बर्‍याच वेळा डोकेदुखीत पोटात मळमळते किंवा उलटी होते. अर्धशिशी कोणालाही होऊ शकते. परंतु त्याची वारंवारता, तीव्रता व त्याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असतो. मळमळणे किंवा उलटी होणे अशी लक्षणे सोबत येतात. त्याची निश्चित वेळ सांगता येत नाही. डोक्यातील रक्तवाहिन्या प्रमाणापेक्षा जास्त आकुंचन व नंतर प्रसरण पावतात. त्यामुळे डोके दुखते. हा आजार अनुवंशिकही आढळतो. एखााद्यालाच अर्धशिशी का होते, याचे नेमके असे कारण नाही. उपाशी राहणे, प्रखर प्रकाशात खूप वेळ राहणे, जागरण, दगदग, मानसिक ताण इत्यादी

गोष्टींमुळे डोकेदुखी होऊ शकते. काहीजणांना सूर्योदयानंतर जे डोकेदुखी सुरू होते, ती सूर्यास्तानंतरच थांबते. असे बरेच दिवस होत असते. यांच्यासाठी आजीबाईचा बटवा तयार असतो. आजीबाईच्या बटव्यामध्ये पूर्वी दुखर्‍या भागावर जमिनीवर काळे मीठ टाकून ते बारीक करून त्यामध्ये थोडीशी हळद मिसळून त्याचा लेप लावणे, हे केले जाई. हळद ही तशी औषधी आणि गुणकारी आहे. सगळ्या आजारांवर उत्तम उपाय म्हणून ही हळद काम करत असते. मग या अशा प्रकारच्या डोकेदुखीवरसुद्धा हळद आणि काळे मीठ यांच्या मिश्रणाचा लेप जालीम उपाय ठरतो. कॉफी, अजिनोमोटो, कोळंबी, चीज, आंबवलेले पदार्थ व आंबट फळे यांच्या सेवनानेही कधी कधी डोकेदुखी होते. परंतु प्रत्येक व्यक्तीत डोकेदुखीचे कारण वेगवेगळे असू शकते.

काहीजणांना वरील पदार्थांचा बिलकुल त्रास होत नाही. ज्याच्या त्याच्या पचनशक्तीचा प्रश्न असतो. दरवेळी खाल्ल्यानंतर डोकेदुखी सुरू झाली तर जो पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो, तो पदार्थ वर्ज्य करावा. डोके दुखायला सुरू होण्यापूर्वी जांभया येणे, थकवा जाणवणे, अतिउत्साह वाटणे, अंधारी येणे, नीट न दिसणे, डोळ्यांसमोर ठिपक्यांसारखे किंवा रेघांसारखे काजवे चमकणे ही सर्व अर्धशिशीची लक्षणे आहेत. तसेच थोड्या थोड्या वेळात हळूहळू डोके ठणकू लागते. या काळात आवाज, उजेड किंवा गोंगाट सहन होत नाही. घरी टी. व्ही. जरी सुरू असेल तर तोही आवाज म्हणजे यांच्या कानाजवळ नगारा वाजवल्यासारखे होते. कोणताही आवाज सहन होत नाही. फक्त डोके घट्ट बांधून पडून राहावेसे वाटते. मग काही तासानंतर डोकेदुखी थांबते.

काही वेळा चुकीच्या आहारामुळे हा डोकेदुखीचा त्रास होतो. आहारात जास्त प्रमाणात तुरडाळ, मसाले पदार्थ, सतत चहा, कॉफीचे सेवन करणे यामुळेसुद्धा पित्त वाढते आणि डोकेदुखी उद्भवते. तसेच उग्र वासामुळे, अत्तरामुळे, तीव्र उजेडामुळे, मासिक पाळीमुळे डोकेदुखी होऊ शकते. या सर्व गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकत नसल्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवणेच उत्तम. काही पदार्थांमुळे डोकेदुखी होतेच. म्हणजे डोकेदुखी करणारे पदार्थ म्हणूनच त्यांची ओळख असते. म्हणजेच वर सांगितल्याप्रमाणे तूरडाळ, चहा, कॉफी, मसालेदार पदार्थांचा मारा थांबवल्यास डोकेदुखी थांबू शकते.

  • डॉ. महेश बरामदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news