

नवजात बाळाला कावीळ होणे ही अगदी सर्वसाधारण गोष्ट आहे. मात्र, त्यावर वेळीच इलाज केला नाही तर मुलांना केर्निकेटरस नावाचा आजार जडू शकतो. त्यामुळे बाळाच्या मेंदूला नुकसान होऊ शकते. कावीळ झाल्यास शरीर, चेहरा आणि डोळ्यांचा रंग पिवळा पडतो. शरीरातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढले की कावीळ होते. बाळाच्या शरीराचा पूर्ण विकास झालेला नसल्याने त्यांच्या यकृतातील रक्तातून बिलिरुबिन बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे कावीळ होते. त्यामुळे बाळाच्या रक्तातील बिलिरुबिनची वेळीच चाचणी करून घ्यावी.
काविळीची लक्षणे
बाळाचे शरीर, चेहरा आणि डोळे पिवळे दिसतात.
बाळ चिडचिडे होऊ लागते.
बाळ सतत रडते.
मुलांची नखे पिवळी पडतात.
बचाव कसा करावा?
स्तनपान ः बाळाच्या शरीरातील बिलिरुबिनचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याला सतत स्तनपान करावे. जेणेकरून त्याला सतत शू व्हायला पाहिजे. काविळीचा त्रास होत असेल तर बाळांना जास्त झोप येते त्यासाठी मुलांना दर 2-3 तासांनी स्तनपान करावे. बाळ स्तनपान करत नसेल तर दूध काढून बाळाला चमच्याने दूध पाजावे.
सूर्यप्रकाश ः कावीळ झाल्यानंतर कोवळ्या उन्हात बाळाला घेऊन जावे. सूर्याची कोवळी किरणे बाळाच्या अंगावर पडल्यास बाळाच्या शरीरात बिलिरुबिनचे प्रमाण कमी होते. बाळाला एक-दोन तास न्यावे. अर्थात थेट उन्हात झोपवू नये.