

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आंतरक्रिया आणि उपक्रमांमधून विचार-आचारांना वळण लावण्याची फार गरज आहे. त्यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये संपर्क, संवाद आणि सहवास हवा.
विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास शिक्षक करतात, मात्र आजच्या काळात त्यांचा भावनिक विकास करण्याची नितांत आवश्यकता आहे. आज कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. शिक्षणातील तीव्र स्पर्धा केवळ परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीकडे लक्ष केंद्रित करायला भाग पाडत आहे. अभ्यास अध्यापन परीक्षा शाळा क्लासेस पुढील कोर्सची तयारी, एन्ट्रन्स एक्झॉमचे शालेय शिक्षणापासूनच लोड देणारे पालक आणि शिक्षकांकडून ती त्यांची अपेक्षा आहे. क्वालिटी स्कूलची व्याख्या व्यापारी तत्त्वावर म्हणजे किती टक्के रिझल्ट व किती विद्यार्थी ऐंशी टक्क्यांच्या पुढे अशा मागणी तसा पुरवठा या दृष्टीने रूढ झाली आहे. मुलांना सतत मार्क, अभ्यास, क्लाससाठी ओरडत आणि सततचं सुपरव्हिजन व जणू नजरकैद असल्यासारखी स्थिती निर्माण करणारे शिक्षक (पालकही) विद्यार्थिदशा ही कोंडमारा करणारी करून ठेवत आहेत.
शालेय वयात मुलांना बर्याच वेळा भावनिक वादळ झेलावे लागते. शिक्षकांनी त्याच्या मनात, मेंदूत होऊ घातलेल्या बदलाची नोंद घ्यायला हवी. त्यांची देहबोली, भाषा, बोलणं, वर्तन आणि कम्युनिकेशन पद्धतीवरून त्यांच्या भावनिकतेची जाणीव तर शिक्षकांना होऊ शकते. मात्र, त्यांच्यामध्ये जवळीक, विश्वास आधार अशा तर्हेचे नाते हवे. तसे ते व्हावे म्हणून शिक्षकच पुढाकार घेऊ शकतात. शिवाय शिक्षकांनी मुलांना आदर द्यावा म्हणजे नात्यात मोकळेपणा येऊन भावना जाणून घेणं सोपं होईल. परस्पर आदर भावना भावनिक बुद्धिमत्ता वाढीस पोषक ठरते.
महत्त्वाची बाब म्हणजे भावनाप्रधान असणं आणि भावनिक बुद्धिमत्ता असणं हे दोन अगदी वेगळे विषय आहेत. भावनाप्रधान असणं म्हणजे प्रसंगानुरूप कणव, राग, लोभ, प्रेम निर्माण होणं प्रत्यक्षात बुडून व कायमचं लक्षात ठेवून असं वर्तन नसते. भावनिक विकास हा टप्प्याटप्प्याने होतो. भावनिक जाणीव ही प्राथमिक पायरी होय. विविध प्रसंग, वेगवेगळे अनुभव घेत असताना आपल्या मनामध्ये आनंद, दुःख, प्रेम, भती, मत्सर, कुतूहल आदींसारख्या भावना ओळखता येणे तसेच इतरांच्या शाब्दिक, अशाब्दिक आविष्कारातून त्यांच्या भावनांचा अंदाज घेता येणे याला भावनिक जाणीव म्हणतात. शिक्षक ते ओळखून वागतील तर विद्यार्थ्यांवर तेच संस्कार होतील. दुसरा टप्पा म्हणजे भावनांचे आकलन, शिक्षकांनी मुलांच्या मनातील भावना समजून घेणे विद्यार्थ्यांची कौटुंबिक स्थिती, आर्थिक स्तर, राहणीमान, घर ते शाळा अंतर वगैरेची माहिती घेऊन व लक्षात ठेवून विद्यार्थ्यांना अडचणीच्या वा चुकीच्या वर्तनावेळी वागणूक देणे हेच शिक्षकांचे कर्तव्य होय.
तिसरा टप्पा म्हणजे केवळ भावना जाणून घेऊन चालणार नाही तर भावनांचे प्रकटीकरण किंवा अभिव्यक्ती शाब्दिक वा अशाब्दिक अशा दोन्ही माध्यमातून होऊ शकते ती शिक्षकांकडून केली जावी. उदा. वर्गात दंगामस्ती करणारी मुले पाहून संतापाने लाल होऊन वर्गालाच शिक्षा करणे म्हणजे निरपराधांना वेठीस धरल्यासारखे नव्हे काय? त्यापेक्षा एकही शब्द न बोलता स्तब्ध राहून वर्ग शांत करण्याचे कौशल्य असणारे शिक्षक अधिक भावतात. चौथा टप्पा म्हणजे भावनांचे समायोजन होय. मनामध्ये निर्माण होणार्या भावना मान्य करणे हे भावनिक विकासासाठी आवश्यक आहे. मुलांना हे समायोजन करण्याची शिकवण शिक्षकांनी वर्तनातून द्यायला हवी. अर्थात, भावनिक संतुलन हे सुद्धा त्यासाठी आवश्यक आहे. शिक्षकांकडे ते हवेत हवे. विद्यार्थ्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत व ते म्हणजे विद्यार्थ्यांना बर्याचशा गोष्टी निरीक्षण, अनुकरण पद्धतीने शिकण्याची सवय असते. तेव्हा शिक्षकांनी त्यांच्यापुढचे रोल मॉडेल बनावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी शक्यतो वैयक्तिक संबंध, भावनिक नाते निर्माण करावे. प्रथम नाव लक्षात ठेवून त्या नावाने संबोधावे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भावनिक आविष्कारास संधी द्यावी. तसेच कार्यानुभव परिपाठ बातम्यांचे वाचन आणि छंदाची जोपासना यातून भावनिक विकास आणि भावनिक आविष्कारास सुयोग्य संधी उपलब्ध करून देता येते. शिक्षकच विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाची जबाबदारी घेऊ शकतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावनांचे वादळ काबूत कसे ठेवायचे? कसे पेलायचे? याची शिकवण शिक्षकांकडून दिली जावी. आजच्या ग्लोबल युगात शिक्षक मल्टिटास्कर बनेल अशी अपेक्षा!