प्राचीन तपोभूमीत खळाळतात उष्ण पाण्याचे झरे

प्राचीन तपोभूमीत खळाळतात उष्ण पाण्याचे झरे
Published on
Updated on

ठाणे; विश्वनाथ नवलू :  भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनार्‍यावर उपलब्ध भूऔष्णिक प्रणालींचा शोध लावला आहे. महाराष्ट्राच्या कोकण भागात आरवलीला गेल्यानंतर उन्हाळीवर पर्यटक दाखल होतात. उन्हाळी म्हणजे उष्ण पाण्याचा झरा. स्थानिक लोकांसाठी हे गरम पाण्याचे एक स्रोत असते आणि त्या पाण्यात औषधी गुण आहेत असे ते मानतात. असे गरम पाण्याचे झरे जमिनीखाली एक किलोमीटरपर्यंत सापडणार्‍या भूऔष्णिक द्रवांचा भाग असतात. नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनात भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील डॉ. तृप्‍ती चंद्रशेखर व त्यांच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद, राजीव गांधी पेट्रोलियम तंत्रज्ञान संस्था अमेठी व इटली स्थित इतर संस्थांमधील सहकार्‍यांनी पश्‍चिम घाटात आढळणार्‍या गरम पाण्याच्या झर्‍यांचा उगम शोधायचा प्रयत्न केला आहे. या झर्‍यांचे निर्माण काही कोटी वर्षे जुन्या बेसॉल्ट खडकांपासून झाले असून त्यात सागरी अवसादाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणून पाहायला गेलेल्या उष्ण पाण्याच्या कुंडांचा इतिहास मोठा रंजक आहे. एका बाजूला गंधक, लोह, बॉक्साईटचे धातू ज्या जमिनीखाली असल्याने भूऔष्णिकता निर्माण होऊन गरम पाण्याचे उद्भव पहायला मिळतात तर दुसर्‍या बाजूला पुरातन मंदिेरे आणि तपोभूमी अशा ठिकाणीच या झर्‍यांचे उगम पाहायला मिळतात. राजापूरची प्रसिद्ध असलेली पवित्र गंगा या प्राचीन शिवक्षेत्रावर जसे गरम पाण्याचे कुंड आहे, तसेच नांदेडमधील शरभृंग ऋषींच्या तपोभूमीतही गरम पाण्याची कुंडे आहेत. रत्नागिरीतील आरवली या पुरातन मंदिर क्षेत्रावरही उष्ण पाण्याचे झरे पहायला मिळतात. सिंधुदुर्गात बुधवळे गावामध्ये शिवक्षेत्रावर गरम पाण्याचे झरे असल्याचे आपण पाहतो. पालघर जिल्ह्यात सातिवली आणि कोपनेर या दोन शिवस्थानांजवळ उष्ण पाण्याची कुंडे आहेत. येथे यात्राही भरतात. त्यामुळे या झर्‍यांचे नाते पुरातन संस्कृतीशी जोडले गेले असावे, असाच सार्वत्रिक समज आहे.

गरम पाण्याचे झरे हा एक अनोखा निसर्ग चमत्कार 

गरम पाण्याचे झरे हा एक अनोखा निसर्ग चमत्कार असला तरी त्याला शास्त्रीय आधारही आहे. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड, अमरावती, जळगाव या जिल्ह्यांत गरम पाण्याचे झरे हे माणसांना आकर्षित करत आहेत. या गरम पाण्याच्या झर्‍यांजवळ भाविक, त्याचसोबत धमाल मस्ती करणारे पर्यटक कायमच गर्दी करतात. महाराष्ट्रातील या जागा आता पर्यटनस्थळे म्हणून गजबजलेल्या आहेत.

ज्या भागात पाण्याचा स्रोत जास्त तिथेच ही कुंडे

ज्या भागात पाण्याचा स्रोत जास्त तिथेच ही कुंडे आढळतात. ज्या वेगाने पाणी भूपृष्ठातून खाली जाते, त्याच वेगाने ते पुन्हा वर येते. अमेरिकेमध्येही अशाच प्रकारचे नॅशनल यलो पार्क म्हणून गरम पाण्याचे फवारे पाहायला मिळतात. भूपृष्ठातील पहिल्या थरात चून खडक, गंधक, बॉक्साईट याच जलस्रोतात मिसळल्याने या पाण्यात आंघोळ केल्यानंतर त्वचारोग दूर होतात, अशाही आख्यायिका आहेत, असे देवगड कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. बी. एस. पोवार यांनी सांगितले.

रत्नागिरी येथील उन्हवरे गावात बारा महिने गरम पाण्याचे झरे सुरू

स्थानिक ग्रामस्थ सांगतात की, रत्नागिरी येथील उन्हवरे गावात बारा महिने गरम पाण्याचे झरे सुरू असतात. सर्व ऋतूमध्ये येथील पाणी गरमच राहते. उन्हवरे येथील गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी पर्यटक नेहमी येत असतात. कोकणातील एक प्रमुख जिल्हा म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना राजापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग आहे. येथून तीन किलोमीटर अंतरावर उन्हवरे गाव आहे. गावात शिवमंदिर असून या मंदिर परिसरातील भिंतीपलीकडून गरम पाण्याचे झरे वाहतात. परिसरात असलेल्या गोमुखातून 24 तास धारा वाहते. रत्नागिरी जिल्ह्यात उन्हवरे, आरवली, तुरळ आणि राजापूर याठिकाणी ही गरम पाण्याची झरे आहेत.

नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरणातील किनवट तालुक्यात उनकेश्‍वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत. या पाण्यात औषधी तत्त्वे असल्यामुळे येथील पाण्यात आंंघोळ केल्यामुळे त्वचेसंबंधित रोगांचे निर्मूलन होते, असे मानले जाते. यामुळे अनेक लोक येथे स्नान करण्यासाठी भेट देतात. ठाणे जिल्ह्यात वज्रेश्‍वरी आणि अकलोली या ठिकाणी गरम पाण्याची कुंडे आहेत. येथे स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. हे पाणी आरोग्यदायक असून त्वचारोगावर गुणकारी मानले जाते. रायगड जिल्ह्यातील साव, उन्हेरे आणि वडवली याठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. याठिकाणी बारमाही पर्यटक येतात. अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी पर्यटनस्थळी महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरम पाण्याचे झरे हे आकर्षण आहे. हे झरे पाहण्यासाठी बारा महिने लोक गर्दी करतात. महाराष्ट्रातील वैविध्यतेने नटलेल्या खानदेशाच्या भूमीत जळगाव जिल्ह्यात चांगदेव, अडावद, उनपदेव, सुनपदेव आणि नाझरदेव या ठिकाणी गरम पाण्याची झरे आहेत. या जिल्ह्यातही निसर्गाचा अनमोल खजिना दडलेला आहे. या परिसराला लाभलेल्या या गरम पाण्याच्या झर्‍यांना पाहण्यासाठी अनेक पर्यटक भेटी देतात.

कोकणचा हा भाग एकेकाळी भूखंडवहन सिद्धांतामुळे सलग उत्तर-दक्षिण दिशेला तीन थरात विस्तारला आहे. पहिला थर हा सागर तट तयार झाला, त्यानंतर दुसरा किनारपट्टीवरील कोकणपट्टीचा थर, तर तिसरा सह्याद्री घाटमाथा. भारतीय उपखंड तुकड्यांमध्ये विभागला गेल्यानंतर पहिल्या थरावरील म्हणजेच वरील भूपृष्ठावरील घसरणीद्वारे पाणी भेगांमधून खाली झिरपते. त्याचवेळी भूगर्भातील तापमानही वाढते. त्यामुळे द्रवरूप पाणी तापमानाच्या संपर्कात आल्यानंतर बुडबुड्यांच्या रूपाने ते बाहेर भूपृष्ठावर त्याच दाबाने फेकले जाते.

– प्रा. बी. एस. पोवार, माजी उपप्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालय, देवगड

भूऔष्णिक द्रव कसे तयार होतात?

  • पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे पाणी खडकातल्या भेगांमधून खोलवर झिरपते. जमिनीखाली तापमान वाढत जाते, ज्यामुळे पाण्याचे तापमान व त्यावरील दाबही वाढत जातो. हे पाणी परत खडकांच्या भेगांमधून झरे व कारंज्याच्या रूपात बाहेर येते. पाण्याच्या प्रवाह मार्गात असणारे खडक पाण्याला काही विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्रदान करतात.
  • भूऔष्णिक द्रवांमध्ये कार्बोनेट, नायट्रेट, झिंक, कॉपर व बोरॉनसारखे अनेक घटक विरघळलेले असतात. या घटकांचा अभ्यास करून पाणी व खडकातल्या आंतरक्रियेची मूलभूत प्रक्रिया, औष्णिक द्रवांचे स्रोत व त्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारा प्रभाव अशा विषयांची उकल शास्त्रज्ञांनी केली आहे.
  • ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाखो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या दख्खन पठाराच्या पृष्ठभागावर बेसाल्ट खडकाचा कमी जास्त जाडीचा थर आहे. बेसॉल्ट खडक ज्वालामुखीत तयार होतो. त्याच्याखाली कलडगी नावाचे सँडस्टोनचे (वालुकाश्म) स्तरीत खडक आढळतात. त्याखाली काही कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेले प्रीकँब्रियन गॅ्रनाईट व नाईस खडकांचा थर असतो. डेक्‍कन पठाराचा विवर्तनी भ्रंश (टेक्टॉनिक फॉल्ट) महाराष्ट्राच्या कोकण भागात उत्तर-दक्षिण दिशेने व किनार्‍याला समांतर आहे. या खडकांच्या रचनेत सातीवली, मंडणगड, आरवली, अंजनेरी, राजापूरसारख्या ठिकाणी उष्ण झर्‍यांचे समूह आहेत.
  • डॉ. चंद्रशेखर यांच्या मते महाराष्ट्राच्या पश्‍चिमी किनार्‍याला समांतर असलेल्या भूपृष्ठ भागावर भूऔष्णिक झरे स्थित आहेत. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पश्‍चिम भारतात झालेल्या ज्वालामुखीच्या तीव्र उद्रेकात झरे निर्माण झाले आहेत. 350 कि.मी. क्षेत्रातून संशोधकांनी 15 औष्णिक झर्‍यांचे नमूने, 8 भूजल नमुने व दोन नदीच्या पाण्याचे नमुने गोळा केले.
  • औष्णिक द्रवांची जमिनीतून वर येण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्यांनी नमुन्यांची रासायनिक रचना, तापमान, क्षारता व विद्युत वाहकतेचा अभ्यास केला. प्रयोगशाळेत उच्च तापमान व दाब निर्माण करून पृथ्वीच्या खोलात होणार्‍या खडक व पाण्याच्या आंतरक्रियेचे अध्ययन केले. भारतातल्या औष्णिक झर्‍याच्या नमुन्यांचे प्रथमच बोरॉन आयसोटोप वापरून अन्वेषण त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news