जुनी सांगवीतील भाजी मंडई धूळखात

दापोडीतील भाजी,फळविक्रेत्यांना हक्काची जागा मिळावी; महापालिकेकडे मागणी
Rajiv Gandhi Bhaji Mandai is still lying in dust
स्व. राजीव गांधी भाजी मंडई अजूनही धूळखात पडून आहेPudhari

नवी सांगवी : जुनी सांगवी येथे महापालिकेची 76 गाळ्यांची भाजी मंडई गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे. एकीकडे नवी सांगवीतील भाजी मंडई सुरळीत आहे; मात्र दापोडीतील भाजी व फळविक्रेते तसेच फेरीवाले व्यावसायिकांना हक्काची जागा मिळावी यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

कोरोना काळात जुनी सांगवी येथील भाजी मंडई सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र स्व. राजीव गांधी भाजी मंडई अजूनही धूळखात पडून आहे. तर दुसर्‍या बाजूला एका पावलाच्या अंतरावर मोकळ्या मैदानावर भाजी मंडई थाटण्यात आलेली आहे.

विक्रेते जास्त, गाळे कमी

भाजी विक्रेत्यांची संख्या जास्त आहे आणि गाळे कमी आहे. त्यामध्ये महापालिकेचे न परवडणारे भाडे आहे. ही कारणे देत भाजी विक्रेत्यांनी या भाजी मंडईकडे पाठ फिरवली. पूर्वी भाजी मंडईत विक्रेत्यांनी गाळा घेऊन भाजी विक्री सुरू केली. मात्र, गल्ली बोळांमधून घरासमोर फेरी मारून होणारी भाजी विक्री, टेम्पोसारख्या वाहनांमधून होणारी भाजी विक्री याचा परिणाम येथील मंडईतील भाजी विक्रेत्यांवर झाला.

मंडईतील भाजी विक्री करणारी मंडळी येथील भाजी मंडईमधील गाळ्यांमधून बाहेर पडली. रस्त्यावरील रहदारीचा अडथळा पाहता रस्त्याच्या कडेला दुतर्फा होणार्‍या विक्रीला प्रतिबंध करण्यात आला. त्यामुळे विक्रेत्यांनी शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेवर भाजी थाटली.

'... व्यवसाय होत नाही'

भाजी विक्रेते म्हणतात अपुरे गाळे आहेत, त्यामध्ये गाळ्यांची रचना बंदिस्त आहे. त्यामुळे व्यवसाय होत नाही. त्यातच पालिकेचे भाडे परवडणारे नाही. विक्रेत्यांची जास्तीची संख्या लक्षात घेता येथील बंदिस्त गाळे काढून पिंपरी भाजी मंडईच्या धर्तीवर ओपन गाळे करण्याची मागणी भाजी विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात येथील भाजी मंडईची दुरुस्ती व रंगरंगोटी करून भाजी मंडई सुरू करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच येथील अडचणींमुळे विक्रेते भाजी मंडईतील गाळ्यांमधून बाहेर पडले.

भाजी मंडई बंद असल्याने गाळे परिसरास बकालपणा

येथील भाजी मंडईचा वापर होत नसल्याने येथे नियमित देखभाल व स्वच्छता होत नाही. याचा उपद्रवी मंडळी फायदा घेतात. येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झालेली आहे. स्वच्छतागृह परिसरात उघड्यावर लघुशंका केली जाते. याच्या सीमाभिंतीला लागून सांगवी रुग्णालय आहे. येथील कर्मचारी, रुग्ण यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

भाजी मंडई ऐवजी या जागेत सांगवी रुग्णालय अद्ययावत करून विस्तारीकरण करण्यात यावे, अशी मागणी येथील परिसरातील नागरिकांकडून होत आहे. नवी सांगवीतील स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मंडई महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात का होईना उभारण्यात आली आहे. मात्र, ती गेली दोन वर्षांपासून सुरळीतरित्या सुरू आहे. याठिकाणी शंभराहून अधिक फळ, भाजी विक्रेते आहेत.

भाजी मंडई गेली अनेक वर्षांपासून जैसे थे अवस्थेत आहे. दापोडीसारख्या ठिकाणी एकीकडे विक्रेत्यांना जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. तर येथे असलेली वास्तू धूळखात पडून आहे. मोकळ्या जागेत थाटलेल्या भाजी विक्रेत्यांना काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असल्यास इतर ठिकाणी जावे लागत आहे.

अनिकेत दीक्षित, नागरिक

येथील भाजी मंडई सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सद्यस्थितीत भाजी मंडईचा अहवाल मागवून भाजी विक्रेते, लोकप्रतिनिधी, स्थानिक मंडळी, यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

उमेश ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी ‘ह’ प्रभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news