Sindhudurg: घराला लागलेल्या आगीत होरपळून विद्यार्थ्याचा मृत्यू | पुढारी

Sindhudurg: घराला लागलेल्या आगीत होरपळून विद्यार्थ्याचा मृत्यू

सिंधुदुर्ग पुढारी वृत्तसेवा: वालावल-ओडोसेवाडी येथे घराला लागलेल्या आगीत रितेश रवींद्र मार्गी या पंधरा वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी 5.30 वा. च्या दरम्यान घडली. घराला आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही.

रितेश हा श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयात नववीत शिकत होता. बुधवारी सायंकाळी 4 वाजता तो नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आला. यादरम्यान बागेत काम करणार्‍या घरातील एका सदस्याला त्याने पाणी नेऊन दिले. या नंतर परत तो घरात आला व घराच्या माळ्यावर अभ्यास करीत बसला.

दरम्यान, सायंकाळी 5 वा. च्या सुमारास घरातील माळ्यावरून धूर येताना दिसला. यावेळी घरातील काही व्यक्तींनी घराला आग लागल्याची ओरड मारली. ती ओरड ऐकून लगतच्या शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी घराकडे धाव घेतली. दरम्यान, रितेश हा माळ्यावर अडकल्याचे लक्षात आल्यानंतर काहींनी माळ्यावर जाऊन धक्का देत दरवाजा उघडला.

त्यावेळी रितेश हा पूर्णतः जळालेल्या स्थितीत दिसून आला. तर माळ्याची खोली आगीत बेचिराख झाली होती. नागरिकांच्या मदतीने रितेशला बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

घराला नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. निवती पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. या हृदयद्रावक घटनेमुळे वालावल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आग लागली त्यावेळी घरामध्ये रितेश एकटाच असल्यामुळे आग नेमकी कशी लागली याबद्दल कोणतीच माहिती मिळू शकली नाही. या घटनेची फिर्याद रितेशचे मामा कृष्णा उमाजी परब यांनी निवती पोलिसांत दिली.

या घटनेमध्ये रितेश अभ्यास करत असलेल्या खोलीतील सर्व इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झाल्याचे दिसून आले. यावरून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज निवती पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गोविंद वारंग यांनी वर्तवला आहे.

Back to top button