भगवान शिव यांचे कुटुंब खूप मोठे आहे. शिवपुत्र गणपतीला ऋद्धी-सिद्धी या दोन पत्नी, आणि शुभ और लाभ असे दोन मुलगे आहेत. शिव ही पुरुष देवता असून ब्रह्मा, विष्णू या देवतांच्या जोडीने तिचे उल्लेख सापडतात. प्रलयाच्या वेळी शिव हा या सृष्टीचा तारणहार आहे असे मानले जाते. या देवतेचे वास्तव्य कैलास पर्वतावर असून पार्वती ह्या त्याच्या पत्नी सह तिथे वास आहे. गणपती आणि कार्तिकेय हे शिवाचे पुत्र तर अशोकसुंदरी त्याची पुत्री मानले जातात.[७]
वैदिक काळात शिव हा रुद्र या स्वरूपात पूजिला जात असे. रुद्र ही ऋग्वेदात मध्यम स्वरूपाची देवता मानली जाते. धनुष्य बाण हे त्याचे आयुध असून तो जटाधारी आहे. तो एक महान वैद्य असून त्याच्याजवळ वेगवेगळी औषधे असतात असे मानले जाते.[७] अथर्ववेदात व्रात्यकाण्ड आहे. यामध्ये रुद्र हा व्रात्यांशी संबंधित देव आहे असे नोंदविले आहे. याला महादेव असे संबोधिले आहे. हा देव नंतर पशूंच्याकडे गेला. त्याला नंतर पशुपती असेही नाव पडले आहे. ब्राह्मणग्रंथांच्या काळात रुद्र ही वैदिक धर्मातील एक महत्त्वाची देवता बनली होती. त्यानंतर उपनिषद साहित्याने देखील महेश्वर, शिव या नावाने या देवतेला सन्मान दिलेला दिसतो.[७]
रामायण हा जरी वैष्णव संप्रदायाचा ग्रंथ असला तरी त्यामध्ये शिवाच्या पूजनाचे संदर्भ दिसतात. रामायणातील शिवाची उपासना ही केवळ मानव करतात असे नसून देव आणि दानवसुद्धा शिवाची पूजा करतात. रावणाने केलेली शंकराची तपश्चर्या हा यातील विशेष उल्लेख मानला जातो.[७]
महाभारतात शिवाचे एक दार्शनिक रूप दिसते आणि दुसरे रूप हे लोकांमध्ये प्रचलित असे आहे. शिवाचा योगदर्शनाशी असलेला संबंध हा ही महाभारतात दिसून येतो. त्याला महायोगी असे संबोधिले आहे.[७]