

मिरज; पुढारी वृत्तसेवा : शहरात तस्करीसाठी आणलेली तब्बल 19 कोटी 17 लाख 20 हजार रुपये किमतीची 19 किलो 172 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी मिरज शहर पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. या उलटीची कोठे विक्री करण्यात येणार होती, याचा तपास करण्यात येत असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले. मंगेश माधव शिरवडेकर (वय 36, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), संतोष ऊर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर (35) आणि वैभव भालचंद्र खोबरेकर (29, दोघे रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मालवण येथून कोट्यवधी रुपयांच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी मिरजेतून केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सर्व संशयित एका कारमधून मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावरील वांडरे कॉर्नरजवळ येणार होते, याची पोलिसांना खबर होती त्यानुसार पोलिसांनी मिरजेत सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार कार वांडरे कॉर्नरजवळ आल्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या तिघांकडून ही उलटी आणि त्याची तस्करी करण्यासाठी वापरलेली 6 लाख 80 हजार रुपयांची कार असा 19 कोटी 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांकडून ही व्हेल माशाची उलटी कोणास विकली जाणार होती, त्याची कर्नाटकात तस्करी होणार होती का? या तस्करीशी मिरजेतील कोणाचा संबंध आहे का? या सर्व बाबींचा तपास मिरज शहर पोलिस करीत आहेत.
मिरजेतून यापूर्वी चंदनाची तस्करी करण्यात येत होती. तसेच तस्करीसाठी नेण्यात येत असलेले कोट्यवधी रुपयांचे रक्तचंदनदेखील मिरजेत पोलिसांनी जप्त केले होते. यासह अन्य प्राण्यांच्या अवयवांंच्या तस्करीसाठी देखील मिरजेचा वापर करण्यात येत होता. आता व्हेल माशाच्या उलटीसाठीदेखील मिरजेचा वापर करण्यात आला आहे.
अटक केलेले तिघे केवळ प्यादी असून या तस्करीमागे मुख्य सूत्रधार कोण? याचा तपास आता पोलिस करीत आहेत. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटी संशयितांनी कोठून आणली, ती कोणत्या समुद्रामधून आणण्यात आली, याची चौकशीदेखील पोलिसांनी सुरू केली आहे.
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी एक साखळी आहे. यापूर्वी जिल्ह्यात व्हेल माशाची उलटी जप्त केली होती; परंतु आजपर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. सिंधुदुर्गमधून या उलटीची सर्वाधिक तस्करी होते. त्या टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागलेला नाही; परंतु अटकेतील तिघांच्या माध्यमातून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.