सातारा : तान्हुल्याला घेऊन ‘माऊली’ची रांगोळी; आळंदी ते पंढरपूर 11 वर्षे अविरत सेवा | पुढारी

सातारा : तान्हुल्याला घेऊन ‘माऊली’ची रांगोळी; आळंदी ते पंढरपूर 11 वर्षे अविरत सेवा

तरडगाव; नवनाथ गोवेकर : कोरोनाच्या निर्बंधामुळे दोन वर्ष माऊलींच्या वारीला खंड पडला होता. माऊलींची सेवा करण्याचं राहून गेल्याने अनेकांच्या मनात खंत राहिली होती. मात्र यावर्षी पालखी सोहळा मोठ्या आनंदाने होत आहे आणि प्रत्येकजण माऊलींची सेवा करण्याचे पुण्य मिळवत आहे. अशीच एक सेवा राजश्री भागवत आपल्या पाच महिन्याच्या तान्ह्या बाळाला सोबत घेऊन आळंदी ते पंढरपूर अखंड वारीत पालखीसाठी रांगोळी काढून करत आहेत. या वारीचा त्यांच्या तान्ह्या बाळालादेखील लळा लागला आहे.

गेल्या अकरा वर्षांपासून पुण्यातील राजश्री भागवत आळंदी ते पंढरपूर वारीत रांगोळी सेवा करण्यासाठी सहभागी होत आहेत. यावर्षी मात्र त्या त्यांच्या पाच महिन्याच्या तान्ह्या बाळासोबत घेऊन सेवा करत आहेत. तान्ह्या बाळाला सोबत घेऊन वारी करणे मनाला न पटणारे असले तरी माऊलींच्या सेवेसाठी त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. वारीने मला ओळख दिली आहे. त्यामुळे मी वारी चुकवू शकत नाही, असे त्या अभिमानाने सांगतात. त्यांच्या या सेवेसाठी त्यांचे पती व सासरची सर्व मंडळ राजश्री यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. बाळाला वारीदरम्यान त्रास झाला तर नाईलाजस्तव माघारी परतावे लागेल पण माऊलींच्या कृपेने त्यांची वारी पूर्ण होणार याची त्यांना खात्री आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या ठिकाणी विसावेल त्या ठिकाणी त्या आपल्या रांगोळीची सेवा करत असतात. चांदोबाचा लिंब येथील रिंगणासाठी त्यांनी तब्बल 1 किलोमीटरच्या पायघड्या रांगोळीने घातल्या होत्या. याबरोबर स्रीभ्रूणहत्या, झाडे लावा, पाणी वाचावा, गोहत्या यासारख्या अनेक समाज प्रबोधनपर विषयावर वारीदरम्यान त्या रांगोळी रेखाटत जनजागृती करत आहेत. या वारीत त्या 450 किलो रंग आणि 80 पोती रांगोळीसह वारीत सहभागी झाल्या आहेत.

गेल्या दोन वर्षात वारी झाली नाही, त्यामुळे मला माऊलींची सेवा करता आली नाही. जेव्हा मागच्या वर्षी माझ्या समोरून माऊलींची पालखी बसमधून पंढरपूरकडे चालली होती तेव्हा खूप रडायला आले. मला रांगोळी काढता आली नाही म्हणून मला खूप वाईट वाटले. पण यावर्षी मी आनंदाने माझ्या चिमुकल्यासह वारीत सेवा करत आहे.
– राजश्री भागवत, पुणे

Back to top button