Wari 2022 : देव निघाले भक्त भेटीला | पुढारी

Wari 2022 : देव निघाले भक्त भेटीला

अरण गावचे संत सावता महाराज म्हणजे कर्म इशु भजावाचे मूर्तिमंत उदाहरण होते. ‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी॥ लसुन मिरची कोथिंबीरी। अवघा झाला माझा हरी॥’ अशाप्रकारे आपल्या मळ्यामध्येच ते पांडुरंग पाहत असत. काहींच्या मते ते पंढरपूरला कधीच गेले नव्हते, तर वारकरी मतानुसार ते पंढरपूरला जात असत; पण बहुदा त्यांना सलग वारी करणे शक्य झाले नसावे.

अरणजवळीलच कुर्मदास या दिव्यांग भक्ताला भेटण्यासाठी देव गेले तेव्हा वाटेत ते अरण येथे संत सावता महाराजांना भेटले, अशीही कथा भानुदास महाराजांनी सांगितली आहे. आजसुद्धा अरण येथून संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरला येत नाही, तर पांडुरंगाची पालखी आषाढी वारी झाल्यावर आषाढ वद्यामध्ये सावता महाराजांना भेटायला अरण येथे जाते. या पालखी सोहळ्याचे आयोजन काशी कापडी मठातर्फे होते.

सोहळ्यातील देवाच्या पादुका कळसे कुटुंबाकडे असतात. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी या पादुका गंगेकर मंडळी काशी कापडी मठात घेऊन येतात. येथे पादुकांची पूजा झाल्यावर पादुका पालखीमध्ये ठेवून पालखीचे प्रस्थान होते. त्यानंतर पालखी फुलांनी सजवलेल्या रथात ठेवून दिंडीसह रथ निघतो. पूर्वी पालखी खांद्यावर वाहून नेत. त्यानंतर बैलगाडीतून नेत असत. आता पालखी वाहण्यासाठी स्वतंत्र रथ आहे. सोहळ्यासोबत एक अश्व असतो.

हा सोहळा 170 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. सोहळा सुरू झाला तेव्हा ही पालखी कोष्टी गल्ली येथील अरणकरांच्या मठातून निघत असे. पुढे काही कारणांनी तो मठ तिथे राहिला नाही तेव्हा सोहळ्यात खंड पडू नये म्हणून अरणकरांनी या पादुका कळसे कुटुंबाकडे दिल्या व काशी कापडी मठातर्फे सोहळा जाऊ लागला. प्रस्थानानंतर रोपळे, आष्टी यामार्गे सोहळा अरण येथे पोहोचतो. पालखीचे जोरात स्वागत होते, फटाके फोडतात. बँड लावून पालखी गावात वाजत गाजत नेली जाते.

पालखीचा मुक्काम गावातील शिंदेवाडा येथे म्हणजे पाटलाच्या वाड्यात असतो. पूर्वी पालखी अमावस्येच्या दिवशी काल्याच्या दिवशी पोहोचत असे. अलीकडे पालखी समाधी सोहळ्याच्या दिवशी पोहोचते. आषाढ वद्य चतुर्दशीला सावता महाराजांचा समाधी सोहळा साजरा होतो. दुसर्‍या दिवशी अमावास्येला काला होतो. यावेळेस जी हंडी फोडली जाते तिला श्रीफळ हंडी असे म्हणतात. ही कीर्तन सेवा देहूकरांकडे असते. यावेळेस दहीहंडीला तीन ते चार हजार नारळ बांधतात. त्यानंतर यात्रेची सांगता होते. अशाप्रकारे समाधी सोहळा झाला की, पालखी पुन्हा पंढरपूरला परत जाते.

अभय जगताप 

Back to top button