वारी : माऊलींच्या नामजपाने वाट सुकर | पुढारी

वारी : माऊलींच्या नामजपाने वाट सुकर

लोणंदः ‘माऊली’ शब्दात फार मोठी ताकद आहे. माऊली नाव घेतले की, डोळ्यांसमोर आई आणि ज्ञानेश्‍वर महाराजांची मूर्ती येते. आई आणि माऊली शब्द बेंबीच्या देठापासून उच्चारले जातात. संपूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण होते.

‘राम कृष्ण हरी’ मंत्र जपत ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करीत वारकरी चालले आहेत. चालत आहेत. कोणी ज्ञानोबांचे, तर कोण तुकाराम महाराजांचे अभंग म्हणत आहेत.

आळंदी ते पंढरपूर पायी वारीला फार वर्षांची परंपरा आहे. पंढरीची वारी देवाची वारी आहे, तर आळंदीची वारी संतांची आहे. वारीत महाराष्ट्रातील विविध भागांतून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील वारकरी सहभागी झाले आहेत. पंढरीच्या वारीला जाऊन दु:खाबदली सुख घ्यायला अवघे वैष्णव चालले आहेत.

वारीत सहभागी होणारे सर्वजण खर्‍या सुखाचा आनंद उपभोगत आहेत. घरातील अडचणी, व्यवसायातील समस्या, प्रापंचिक कटकटी आणि रोजच्या जीवनातील तोचतोचपणा बाजूला सारून वारकरी वारीला आला आहे. घरी कधी सातच्या आत न उठणारा पहाटे चार वाजता अंघोळ करून तयार असतो. स्वतःचे ताट न उचलणारा येथे ताट धुऊन ठेवतो आहे. स्वतःची कपडे स्वत: धुतो, सारी कामे करत आहे. दुसर्‍याला मदत करताना आपला जवळचा पाहणारा येथे भेटेल त्याला मदत करण्यासाठी आतुर आहे. वारकर्‍यांसाठी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ हे स्फूर्ती देणारे भजन आहे.

वारीत सगळे माऊली आहेत. सकाळी सकाळी भेटलेल्या प्रत्येकाला काय माऊली झाली का अंघोळ, जेवला का माऊली, चहा घ्या माऊली, इकडे या माऊली, पाया पडताना माऊली, चुकून पाय लागला तरीही माऊली. वारीत चालताना खूप गर्दी असते. सारे ओळीत शिस्तीने चालतात. एखादा बाहेर गेला तर ओ माऊली कुठे चाललाय? चालताना रस्त्यावर बाजू पाहिजे असेल तर ओ माऊली, बाजूला ढकलायचे असेल तरीही ओ माऊलीच.

वारीत सहभागी सगळे स्त्री-पुरुष, लहान-मोठा, वयस्कर, बालक सारेजण माऊलीच. जेवताना काही पाहिजे असेल तर ओ माऊली, कुणाला फोन केला तर सुरुवातीला नमस्कार माऊली. एकत्र यायचे असेल तर माऊलींनो या, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर काहो माऊली, गर्दीत ढकलाढकली झाली तर असे का करताय माऊली. इथे माऊली हा शब्द प्रमाण आहे. दुसरे काही नाही. अवघे वैष्णव ज्ञानेश्‍वर महाराज यांना माऊली म्हणतात. आई जशी आपल्या लेकरासाठी सर्व काही करते, मनापासून प्रेम करते, आईच्या मायेला अंत नसतो, तसे ज्ञानेश्‍वर माऊलींनी भावार्थदीपिका ‘ज्ञानेश्‍वरी’ या महान ग्रंथातून अवघ्या विश्‍वाला शिकवण दिली.

लेकुराचे हित ।
वाहे माऊलीचे चित्त ॥
ऐसी कळवळ्याची जाती ।
करी लाभाविण प्रीती ॥

माऊलींनी आईप्रमाणे सगळ्यांचे लाड पुरवले आहेत. त्यांचे नाव घेतले की, तनामनात स्फुलिंग निर्माण होते. आई हा शब्द उच्चारताच स्त्रीचे वात्सल्य जागे होते, त्याप्रमाणे माऊली नाव घेतले की, भगवंताच्या प्रीतीचा पान्हा जागा होतो.

सतीश मोरे 

Back to top button