भेटी लागी जीवा; ‘ज्ञानोबा-तुकोबां’च्या पालखी दर्शनाने पुणेकरांना परमानंद! | पुढारी

भेटी लागी जीवा; ‘ज्ञानोबा-तुकोबां’च्या पालखी दर्शनाने पुणेकरांना परमानंद!

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आपल्या हातातील नियोजित कामे तशीच टाकून, कामधंद्यावर सुटी घेऊन पुण्यातील भाविकांनी गुरुवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. या वेळी माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच-लांब रांगा आणि दर्शनासाठीची चढाओढ भाविकांना माउली, तुकोबांच्या भेटीची प्रचंड आस असल्याची साक्ष देत होती. आळंदी येथून मंगळवारी सायंकाळी निघालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी गांधीवाडा येथे मुक्काम करून बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुण्यात मुक्कामाला आली.

दरवर्षीप्रमाणेच यंदाही भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात माउलींच्या पालखीचा मुक्काम होता. बुधवारी रात्री पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर मंदिर प्रशासनाकडून माउलींच्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दहीभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. तेव्हापासून सुरू झालेली दर्शनबारी गुरुवारी दिवसभर सुरू होती. दरम्यान, गुरुवारी सकाळी मंदिर प्रशासनाने अभिषेक करून आरती केली. त्यानंतर दिवसभर पुणे आणि परिसरातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी सुरूच राहिली. गुरुवारी रात्री अभिषेक झाल्यानंतर रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा होत्या.

98 वर्षांचे आजोबा निघाले पंढरीला; तरुणांनाही लाजवेल असा उत्साह अन् जोश

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या श्री निवडुंग्या विठोबा देवस्थान संस्थान (नाना पेठ) येथे भरपावसातही भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली अन् पालखी सोहळ्याचा रंग अनुभवला. उत्साह अन् पालखीचा आनंद सोहळा अनुभवण्यासाठी बुधवारी (दि.22) पुण्यात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे श्री निवडुंग्या विठोबा देवस्थान संस्थान (नाना पेठ) येथे आगमन झाले. पालखीचे स्वागत पारंपरिक पद्धतीने झाले, अभंग सादर झाले आणि आरती झाली. त्यानंतर दर्शनबारी सुरू करण्यात आली.

मंदिरात गुरुवारी (दि.23) दिवसभर पालखीचा मुक्काम होता. मंदिरात सकाळपासूनच पादुकांच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. वारकर्‍यांसह पुण्यातील विविध भागातून आलेल्या भक्तांनी दर्शन घेतले. मंदिराचे व्यवस्थापक आनंद पाध्ये म्हणाले, ‘दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरांत पालखी मुक्कामासाठी आल्यापासून वारकर्‍यांच्या मुक्कामाची योग्य व्यवस्था केली होती. मानाच्या सात ते आठ दिंड्या मुक्कामासाठी होत्या. त्यांच्या मुक्कामासह आणि जेवणाची सोय केली होती. पालखी मुक्कामाच्या दिवशी आबालवृद्धांनी दर्शनासाठी गर्दी केली. तुकोबा पालखीचेे शुक्रवारी (दि.24) सकाळी सात वाजता प्रस्थान होणार आहे.

पहाटे सहा वाजता पालखी पुढील मुक्कामी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बुधवार आणि गुरुवार दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर शुक्रवारी (दि. 24) सकाळी पुढील प्रवासासाठी निघणार आहे. पालखी हडपसर, दिवे घाटमार्गे सासवड येथे जाईल.

हेही वाचा

अब्दुल सत्तार भाजपसोबत आल्यास आपले काय ?; सिल्लोड भाजप पक्षासमोर पेच

बीड : अवैध गर्भपात प्रकरणात डॉ.गवारेला ताब्यात घेणार

औरंगाबाद : बंडखोर आसामात, कुटुंब मतदारसंघात; पोलिस बंदोबस्त

Back to top button