98 वर्षांचे आजोबा निघाले पंढरीला; तरुणांनाही लाजवेल असा उत्साह अन् जोश | पुढारी

98 वर्षांचे आजोबा निघाले पंढरीला; तरुणांनाही लाजवेल असा उत्साह अन् जोश

पुणे : पुढारी वृत्तसेवा: मनात विठुमाउलीच्या भेटीची आस घेऊन 98 वर्षांचे आजोबा पंढरीची वारी करताहेत… तेही 56 वर्षांपासून… यंदाही ते वारीत सहभागी झाले असून, तरुणांनाही लाजवेल अशी ऊर्जा घेऊन लक्ष्मण शेरकर हे पालखीत चालताहेत. जवळपास 450 किलोमीटरचा प्रवास करून लक्ष्मण शेरकर पुण्यात पोहोचले आहेत. आताही असाच लांब पल्ल्याचा पायी प्रवास करून पंढरीकडे निघालेत. जिद्द, आत्मविश्वास अन् माउलीला भेटण्याची आस काय असते, हे त्यांना पाहून नक्कीच कळते. डोळ्यांची नजर कमी झाली असली तरी पालखीसोबत चालण्याचा उत्साह आहे. आजोबांच्या या ऊर्जेने इतर वारकर्‍यांना वारीत चालण्याची प्रेरणा मिळत आहे.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीत दिंडी क्रमांक 1 मध्ये शेरकर सहभागी झाले आहेत. आजोबांना कोणतेही आजार नाहीत. वय विसरून ते पालखीत चालत आहेत. शेरकर सांगतात, ‘पूर्वी कधी जन्मलो किंवा आपल्या जन्माची तारीख काय आहे हे लिहिले जात नसायचे… आईने जी जन्माची तारीख सांगितली, त्यानुसार वय मोजत गेलो आणि आता 98 व्या वर्षांचा झालो आहे.

मी मुळचा बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पाथरूड गावचा आहे. माझ्या कुटुंबात कोणीही नाही. मला कोणतेही आजार नाहीत.’ ‘दोन वर्षे पालखी नव्हती म्हणून खूप रुखरुख होती. पण, यंदा सोहळा असल्याचा आनंद आहे. वय झाले तरी काय झाले, जोपर्यंत अंगात ताकद आणि हिंमत आहे तोपर्यंत वारीत पायी चालणारच. मला वारीत आनंद मिळतो, त्यातून समाधान मिळतेे. त्यामुळेच वारीत दरवर्षी मी न चुकता येतो,’ असेही ते आवर्जून सांगतात.

हेही वाचा

बीड : अवैध गर्भपात प्रकरणात डॉ.गवारेला ताब्यात घेणार

नेवासा : निबंधकांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी

नगर : पहिल्याच पावसात गुंडेगावचा बंधारा तुडूंब

Back to top button