पंढरपूर दिंडीला राहुरीकरांकडून भक्तिभावाने निरोप | पुढारी

पंढरपूर दिंडीला राहुरीकरांकडून भक्तिभावाने निरोप

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  टाळ, मृदंगाच्या गजरात… ज्ञानोबा माउली.. तुकाराम.. असा जयघोष करीत बुधवारी सायंकाळी राहुरीत दाखल झालेल्या श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज दिंडीतील हजारो वारकर्‍यांचे राहुरीकरांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, आज (गुरुवारी) सकाळी मोठ्या भक्तीभावाने राहुरी शहरातून दिंडीला निरोप देण्यात आला.

बनावट नोटांच्या काळ्या साम्राज्याला लगाम हवाच

बुधवारी सायंकाळी 6 वाजता त्र्यंबकेश्वर येथील जयंत महाराज गोसावी, बेलापूरकर महाराज, दाते महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्तीनाथ महाराज पालखीचे राहुरी शहरात आगमन झाले. पालखी नगर-मनमाड राज्य महामार्गावर पाण्याच्या टाकीजवळ दाखल होताच सालाबादप्रमाणे श्री खंडेराया महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने सदाशिव शेळके, अमोल तनपुरे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, अशोक वामन, रावसाहेब हरिश्चंद्रे, सुनील पवार, गवराज तनपुरे, हरिभाऊ उंडे, गोरख चव्हाण, अशोक तुपे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. भागिरथीबाई कन्या शाळा प्रांगणात पालखीचा मुक्काम असल्याने दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गर्दी केली. श्रीखंडेराया महाराज देवस्थान ट्रस्टने वॉटरप्रूफ मंडपासह मॅटची व्यवस्था केली. गाडगेबाबा आश्रमशाळेचे वर्ग खुले करण्यात आले होते.

राहुरीत दरवळला भक्तीचा सुगंध..!
मुसळधार पावसात डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चाललेल्या महिला वारकरी, भगवे झेंडे घेऊन टाळ, मृदंगाचा गजर व ज्ञानोबा माउली.. तुकाराम.. हा जयघोष करीत आलेल्या हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीने राहुरीतील वातावरण भक्तिमय झाले होते. सर्वत्र भक्तीचा सुगंध दरवळला.

Back to top button