अवघा रंग एक झाला... महिला, युवती वारीत दंग; दोन्ही पालख्यांत उत्स्फूर्त सहभाग | पुढारी

अवघा रंग एक झाला... महिला, युवती वारीत दंग; दोन्ही पालख्यांत उत्स्फूर्त सहभाग

पुणे : आयटीत काम करणार्‍या युवतींपासून ते वारकरी महिलांपर्यंत…दोन्ही पालख्यांमध्ये महिला अन् युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सामाजिक उपक्रम असो वा पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिला…पालखीच्या भक्तिरंगात त्यांनीही हिरिरीने या भक्ती सोहळ्यात सहभाग नोंदवला आणि मग अवघा रंग एक झाला.अगदी शेतकरी महिलेपासून ते नोकरदार युवतीपर्यंत….80 वर्षांच्या ज्येष्ठ महिलांपासून ते गर्दीत पाणी वाटप करणार्‍या छोट्या मुलींपर्यंत पालखी सोहळ्यात महिला-युवतींचा सहभाग लक्षणीय आहे.

डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, मोबाईलवर छायाचित्र टिपणार्‍या युवती, अभंग म्हणणार्‍या अन् फुगड्या खेळणार्‍या महिला व फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या मित्र-मैत्रिणींना पालखीची झलक दाखविणार्‍या युवती असे काही चित्र पालखी सोहळ्यात पाहायला मिळाले. वैद्यकीय सेवा बजाविणार्‍या, सामाजिक उपक्रमात सहभाग घेणार्‍या आणि पालखीत पायी चालणार्‍या अशा प्रत्येक गोष्टीत महिला-युवतींचा सहभाग दिसला. अनिता पवार या संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी आल्या होत्या.

त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. त्या म्हणाल्या, ‘दर्शन घेऊन खूप आनंद वाटला. दरवर्षी पालखी दर्शनासाठी येते. यंदा चांगले दर्शन झाले.’ किमया जाधव ही पहिल्यांदाच पालखी सोहळा पाहायला आली होती. माझी खूप दिवसांपासून पालखीत सहभागी होण्याची इच्छा आज पूर्ण झाली. दोन वर्षांनंतर का होईना हा सोहळा तमाम मराठी जनांसाठी आनंद सोहळा आहे, अशी प्रतिक्रिया किमयाने दिली.

सोलापूर : वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलबाबत नियोजन

पर्यावरण संवर्धनाचा संदेश
‘स्वच्छ सुंदर परिसर, आरोग्य नांदेल चिरंतन’ असे विविध संदेश असलेले फलक हातात घेऊन लोक पर्यावरण दिंडीत सहभागी झाले. पर्यावरण संवर्धनाचा नारा बुलंद करीत त्यांनी पर्यावरण जागृतीचा संदेश दिला. आळंदी ते पुणे या मार्गादरम्यान पर्यावरण दिंडी काढण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगरमधील पदाधिकारी यात सहभागी झाले होते.

हौशी छायाचित्रकारांची धडपड…
दोन वर्षांनंतर पालखी सोहळा असल्याने हौशी छायाचित्रकारांनी छायाचित्रणाची संधी सोडली नाही. पालखीच्या गर्दीत क्षणचित्रे टिपणार्‍या छायाचित्रकारांची आणि व्हिडिओग्राफरची संख्या मोठी आहे. टाळ-मृदंगाच्या जयघोषात निघालेले वारकरी असो वा वारीत सामाजिक सेवा करणारे कार्यकर्ते, अशी बहुविध छायाचित्रे ते टिपत होते. हा अद्वितीय क्षण आपल्या कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. वाकडेवाडीत दोन्ही पालख्यांचे आगमन होताच, त्यांच्यात छायाचित्र टिपण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती.

आयटी दिंडीचाही सहभाग…
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आयटी दिंडीतील तरुणाईने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाला समर्पित ‘अमृत वर्ष, विठोबाचा हर्ष’ असा संदेश वारीत दिला. आळंदी ते पुणे या मार्गावर आयटी दिंडीतील वारकरी सहभागी झाले अन् त्यांनीही हा संदेश देणार्‍या टोप्या घातल्या होत्या. दरवर्षी आयटी दिंडीत दिसणारा उत्साह यंदाही पाहायला मिळाला.

मोफत मूळव्याध तपासणी
संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान असणार्‍या या वारकरी बांधवांसाठी डॉ. कामठे पाईल्स क्लिनिक, सर्जिकल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्यामार्फत मूळव्याध, भगंदर, फिशर या आजारांसाठी वारीदरम्यान मोफत तपासणी व औषधोपचार केले जाणार आहेत. डॉ. कुणाल कामठे, डॉ. शर्मिला कामठे, डॉ. अनुप लकडे, डॉ. भूषण भोंडे, नम्रता साळुंके, जयश्री सिस्टर, प्रदीप मोरे, अमोल खुटवड हे सर्वजण या उपक्रमात सहभागी होणार आहेत. पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, व पंढरपूर या ठिकाणी या शिबिराचा रुग्णांना लाभ घेता येईल. सकाळी 9 ते सायंकाळी 8 या वेळेमध्ये रुग्ण लाभ घेऊ शकतील.

हेही वाचा

सोलापूर : वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलबाबत नियोजन

घरात झुरळे सोडून देणार दीड लाख रुपये!

लॉरेन्स बिष्णोई गँगचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन

Back to top button