

मेलबोर्न : निसर्गाचे ऋतुचक्र, हवामान व त्याची तीव्रता आपल्या सर्वांगीण विकासाला आकार देत असते. काही संशोधकांचे म्हणणे आहे की प्रारंभिक मानव आणि त्यांचे पूर्वजही आपल्या पर्यावरणातील वेगाने झालेल्या बदलामुळे विकसित झाले होते. मात्र, या सिद्धांताला पुष्टी देण्यासाठीचे पुरावे उपलब्ध नाहीत. आता 1 कोटी 70 लाख वर्षांपूर्वीच्या वानरांचे दात यासाठीच्या अध्ययनासाठी मदत करू शकतील.
एक दशकापेक्षाही अधिक काळ झालेल्या संशोधनानंतर दिसून आले आहे की जीवित आणि जीवाश्मभूत प्राण्यांच्या जबड्यावरून पावसाच्या चक्राबाबतची माहिती मिळू शकते. याबाबतची माहिती 'प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेज'मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. दात हे पर्यावरणाचे 'टाईम मशिन' आहेत. एखाद्या झाडाच्या खोडामध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक वर्षी नवे वर्तुळ बनत असते व त्यानुसार त्याचे वय ठरवता येते तसाच प्रकार दातांचाही असतो. लहानपणी आपले दात अशा स्तरांप्रमाणेच सूक्ष्म स्तरांमध्ये वाढतात.
आपल्या आजुबाजूच्या पर्यावरणातील व हवामानातील परिवर्तनाचा परिणाम या स्तरांमध्ये नोंदवलेला असतो. हे घडते पेयजलातील ऑक्सिजनच्या समस्थानिक संरचनेमुळे. ते तापमान आणि पावसाच्या ऋतुचक्राप्रमाणे बदलत असते. असे 'रेकॉर्ड' जीवाश्मभूत दातांच्या अॅनेमलमध्येही बंद असते जे लाखो वर्षांपर्यंत रासायनिक स्थिरता टिकवून राहते. आता संशोधक आफ्रिकेतील सध्याच्या केनियाच्या भूभागात 1 कोटी 70 लाख वर्षांपूर्वी राहणार्या अफ्रोपिथेकस टर्कनेन्सिस नावाच्या वानरांच्या जीवाश्मभूत दातांचे अध्ययन करीत आहेत.